झुक झुक गाडीत वसली खटावची जिल्हा परिषदेची वस्ती शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:19 AM2019-01-25T00:19:35+5:302019-01-25T00:21:28+5:30
धुरांच्या रेषा करत झुक झुक धावणारी रेल्वे म्हणजे बच्चे कंपनीची आवडती सफारी. याच रेल्वेत बसून आनंदी वातावरणात शिक्षण घेता आले तर? प्रश्न पडला ना? पण मिरज तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व कर्नाटक सीमेवरील
सांगली : धुरांच्या रेषा करत झुक झुक धावणारी रेल्वे म्हणजे बच्चे कंपनीची आवडती सफारी. याच रेल्वेत बसून आनंदी वातावरणात शिक्षण घेता आले तर? प्रश्न पडला ना? पण मिरज तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व कर्नाटक सीमेवरील खटावमधील व्हनानावर वस्ती शाळेने हे स्वप्न सत्यात उतरविले आहे. शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी कलात्मकतेला वाव देत शाळेच्या इमारतीला रेल्वे डब्याचे आकर्षक रूप दिले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने या शाळेची एक्स्प्रेस सुसाट धावत आहे.
खटावच्या वस्ती भागात ही शाळा आहे. शाळा परिसरातील पालकांची घरातील भाषा कन्नड. त्यामुळे मुलांचेही संपूर्ण संभाषण कन्नड भाषेतून होते. या शाळेत बदलीने मीलन नागणे आणि अनिल मोहिते हे तरूण शिक्षक रूजू झाल्यानंतर त्यांनी कमी कालावधित शाळा नावारूपास आणली आहे. काहीशा गैरसोयीच्या असलेल्या या शाळेत नागणे आणि मोहिते यांनी प्रयत्न करत बदल घडविले आहेत. शाळेमध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी पालकांना प्रवृत्त केले. शिक्षक स्वत: पुढाकार घेऊन आपली शाळा चांगली करण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे पाहून पालकांनीही मदत सुरू केली आहे.
गुणवत्तेसोबतच परिसर सुशोभिकरण करत शालेय इमारत सुसज्ज असावी यासाठी इमारत रंगरंगोटी करण्याचे ठरविण्यात आले. जुन्या पत्र्याच्या खोल्यांना रेल्वेच्या प्रतिकृतीसारखी रंगछटा देण्याची संकल्पना पुढे आली. गावातील शाळेतील उत्साही शिक्षक सुनील लांडगे यांनी स्वत: सुटीच्या कालावधित शाळेमध्ये रेल्वेची प्रतिकृती साकारण्याची तयारी दर्शवली. दिवाळीच्या सुटीतही त्यांनी वेळ देत हे काम पूर्ण केले. अनिल मोहिते व मीलन नागणे हे दोघेही त्यांना मदतीसाठी होते.
मंगळवारी खटावच्या सरपंच सुजाता व्हनानावर, उपसरपंच गुरुपाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच रावसाहेब बेडगे, अमोल शिंदे आदींच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शालेय प्रगतीच्या रुळावरून ‘व्हनानावर एक्स्प्रेस’ सुपरफास्ट वेगाने गतिमान करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात माझी शाळा अभियान सुरू आहे. या अभियानातून लोकसहभागातून शाळांच्या प्रगतीची संकल्पना पुढे आली आहे. याच अभियानातून व्हनानावर वस्ती शाळेचे काम गतिमान सुरू आहे.या उपक्रमाची प्रेरणा घेत तालुक्यातील अन्य शाळांनीही आता उपक्रम राबविण्यासाठी नियोजन केले आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहेत.
गुणवत्तेतही आघाडी
वस्ती शाळेचे रूपडे बदलण्याबरोबरच येथील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठीही शिक्षकांनी प्रयत्न चालविले आहेत. त्यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
खटाव (ता. मिरज) येथील व्हनानावर वस्तीवरील शाळेला रेल्वेचे रुपडे मिळाल्यानंतर या उपक्रमाचे उद्घाटन सरपंच सुजाता व्हनानावर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गुरुपाद पाटील, रावसाहेब बेडगे, अमोल शिंदे आदी उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात नव्या इमारतीतून डोकावत विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाचे उत्साहात स्वागत केले.