कुंडलच्या मैदानात मौसम खत्री, कृष्णकुमार विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:36 PM2018-09-30T23:36:10+5:302018-09-30T23:36:15+5:30

Khatri, Krishnakumar, won the Kundal field | कुंडलच्या मैदानात मौसम खत्री, कृष्णकुमार विजयी

कुंडलच्या मैदानात मौसम खत्री, कृष्णकुमार विजयी

Next

आशुतोष कस्तुरे
कुंडल : कुंडल (ता. पलूस) येथील ऐतिहासिक महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रतिवर्षाप्रमाणे कुस्तीशौकिनांचा अमाप उत्साह असताना, प्रमुख लढती निकाली होत नसल्याने अखेर संयोजकांना हस्तक्षेप करावा लागला. तासाभराच्या खडाखडीनंतर हिंदकेसरी मौसम खत्री याने हिंदकेसरी प्रिन्स कोहली याला, तर कृष्ण कुमार याने अजय गुज्जरला मुलतानी डावावर चितपट केले.
अनंत चतुर्दशीनंतर येणाऱ्या रविवारी होणारे कुंडल येथील लाल मातीचे मैदान निकाली कुस्त्यांसाठी देशभरात प्रसिध्द आहे. गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळे हे मैदान रद्द करण्यात आले होते. यामुळे यंदाच्या मैदानात कुस्तीशौकिनांचा दुप्पट उत्साह दिसून आला. क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, सार्वजनिक गणेश उत्सवाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांच्याहस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. मैदानात शंभरवर चटकदार कुस्त्या झाल्या.
हिंदकेसरी मौसम खत्री विरुध्द हिंदकेसरी प्रिन्स कोहली, तसेच कृष्णकुमार विरुद्ध अजय गुज्जर यांच्या प्रमुख लढती होत्या. दोन्हीही कुस्त्यांमध्ये नुसतीच खडाखडी दिसू लागल्याने प्रेक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला. अखेर संयोजकांनी कुस्ती थांबवून चारही मल्लांना कुंडलच्या निकाली कुस्त्यांच्या परंपरेची जाणीव करून दिली. अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी कुस्त्या निकाली करणे आवश्यक असल्याचे बजावले.
यानंतर पुन्हा लढती सुरू झाल्या. यानंतर अवघ्या नऊ मिनिटात मौसम खत्रीने मुलतानी डावावर प्रिन्स कोहली याच्यावर विजय मिळविला, तर कृष्णकुमार विरुद्ध अजय गुज्जर यांच्या लढतीत कृष्णकुमार याने अजय गुज्जरला मुलतानी डावावर चितपट करीत प्रेक्षकांची वाहवा मिळविली.
मैदानात सागर बिराजदार (गोकुळ, पुणे) विरुध्द समाधान पाटील (खवसपूर) यांचीही कुस्ती बराच वेळ रेंगाळली. कुस्ती निकाली होत नसल्याचे पाहून संयोजकांनी हस्तक्षेप करीत इनाम रद्द करून कुस्ती बरोबरीत सोडवली.
मैदानात माऊली जमदाडे (गंगावेश तालीम, कोल्हापूर) विरुध्द गौरवकुमार मच्छीवारा (भक्तिनाथ आखाडा, पंजाब) यांची कुस्ती चांगलीच रंगली. तब्बल २० मिनिटे चाललेली ही लढत क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारी ठरली. अखेर गौरवकुमार मच्छीवारा याने घुटना डावावर माऊली जमदाडेवर विजय मिळविला. भारत मदने विरुध्द दिल्लीच्या सोनीपथ आखाड्याचा मल्ल रामवीर यांच्या लढतीत भारत मदने याने रामवीरवर घुटना डाव टाकून मात करीत ‘सत्यविजय केसरी’चा किताब पटकावला.
याशिवाय मैदानात शंभरहून अधिक लहान-मोठ्या लढती झाल्या. यामध्ये योगेश बोंबाळे (गंगावेस तालीम, कोल्हापूर), विलास डोईफोडे (गोकुळ, पुणे), महेश शिंदे (खवासपूर), सिकंदर शेख (गंगावेश तालीम, कोल्हापूर), अनिल धोत्रे (बेनापूर), संतोष सुतार (बेणापूर), विक्रम घोरपडे (खवसपूर), सौरभ सव्वाशे, वाजीद पटेल, तुषार निकम, उदय लोंढे, प्रथमेश पाटील, मुकुंद यादव, संग्राम सूर्यवंशी, अक्षय जाधव, युवराज बंडगर, कृष्णा पवार, ऋषिकेश देवकाते, नामदेव केशरी, अमोल नरळे, कृष्णा पवार, तानाजी वीरकर, धीरज पवार (शाहूपुरी) यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला.
मैदानाला आमदार बाळासाहेब पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार आनंदराव पाटील, खासदार संजय पाटील, माजी आमदार मानसिंग नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सत्यविजय बँकेचे संचालक प्रशांत पवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रामचंद्र लाड, गोपीचंद पडळकर, राजाराम गरुड, उत्तमराव फडतरे, आप्पासाहेब पठारे, गौरव नायकवडी, उत्तमराव पाटील, मानसिंग उद्योग समूहाचे प्रमुख जे. के. जाधव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, संभाजी सावर्डे, अस्लम काझी, बापूसाहेब पाठारे, जयसिंग कदम, नारायण साळुंखे यांची उपस्थिती होती. समालोचन महादेव लाड, शंकर पुजारी, माणिक गोतपागर यांनी केले.
महिला कुस्त्यांना दाद
मैदानात महिला कुस्तीमध्ये संजना बांगडी हिने लपेट डावावर ऋतुजा जाधववर विजय मिळवला. याशिवाय राखी कांबळे ( सांगली), आर्या पवार (अंतवाडी), वैष्णवी पवार यांच्या प्रात्यक्षिक कुस्त्या झाल्या. त्यांनीही पे्रक्षकांची वाहवा मिळविली.

गणेश मानुगडे यांना पुरस्कार
मैदानात कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल क्रांतिवीर शामराव बापू लाड उत्कृष्ट वस्ताद पुरस्कार देऊन ‘कुस्ती मल्लविद्या’चे गणेश मानुगडे यांना गौरविण्यात आले.
रशियन मल्लांची भेट
कुंडलच्या ऐतिहासिक कुस्ती मैदानाचा डंका आता देशातच नव्हे, तर विदेशातही वाजू लागला आहे. मैदानास रशियन मल्ल उमर आणि तिमरलंग यांनी भेट देऊन लढतींचा आनंद घेतला.
राजकारणविरहित परंपरा
मैदानातील प्रमुख दोन्ही कुस्त्या राजकीय विरोधक असलेले क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड व महेंद्र लाड यांनी पुरस्कृत केल्या होत्या. कुंडलच्या ऐतिहासिक कुस्तीची परंपरा जपताना या दोन्ही गटांनी आजवर राजकारण बाजूला ठेवले आहे. हीच परंपरा अधोरेखित करताना यावर्षी अरुण लाड यांनी आमदार पतंगराव कदम यांच्या स्मरणार्थ, तर महेंद्र लाड यांनी ‘क्रांती’चे संस्थापक जी. डी. (बापू) लाड यांच्या स्मरणार्थ लढत पुरस्कृत केली.

 

Web Title: Khatri, Krishnakumar, won the Kundal field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.