खाऊची पाने यंदा होणार महाग, थंडी जोमात आणि पानवेली कोमात
By श्रीनिवास नागे | Published: November 9, 2022 05:52 PM2022-11-09T17:52:19+5:302022-11-09T17:52:50+5:30
पदरमोड करून तयार केलेले पानमळे परतीच्या पावसाने व थंडीने डोळ्यादेखत नामशेष होत आहेत.
सांगली : अतिरिक्त पाऊस व थंडीमुळे मिरज पूर्व भागातील पानमळ्यातील पानवेलींच्या मुळांची वाढ खुंटत असल्याने पानवेली सुकू लागल्या आहेत. थंडी जोमात आणि पानवेली कोमात अशी पान उत्पादकांची स्थिती झाली आहे. उत्पादन घटल्याने खाऊची पाने यंदा महाग होणार असल्याचा अंदाज आहे.
मिरज पूर्व भागातील पानमळ्यांची संख्या जास्त आहे. यंदा परतीच्या पावसाने सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पानमळ्यांमध्ये पाणी जास्त होऊन जागेवरच मुरण्याची प्रक्रिया झाली. याचे परिणाम आता जाणवायला सुरुवात झाली आहे. पावसाने पानवेलीची मुळे कुजून पानवेली सुकू लागल्या आहेत. पान उत्पादकांनी मुळकूजव्या रोगाच्या नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करुनही हाती निराशाच आली आहे. मुळकूज रोगाने पानवेलींची पाने गळून पडत आहेत. त्यानंतर पानवेल हळूहळू सुकून जाते. एकदा हा रोग पानमळ्यात घुसला की पानमळ्यातील सर्व पानवेली आठ दिवसांत नामशेष होतात.
एक गुंठा पानमळा तयार करण्यासाठी किमान पाच ते सात हजार रुपये खर्च येतो. दहा गुंठे पानमळा लागणीसाठी किमान ५० ते ७० हजार रुपये खर्च येतो. पानवेली लागणीनंतर दुसऱ्या वर्षापासून पाने खुडणीस येतात. पान खुडणीसाठी कुशल कामगारच लागतात. याही कामगारांना आगाऊ पैसे दिले तरच ते कामावर येतात. इतकी पदरमोड करून तयार केलेले पानमळे परतीच्या पावसाने व थंडीने डोळ्यादेखत नामशेष होत आहेत. यामुळे पान उत्पादकांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादन घटल्याने खाऊची पाने यंदा महागणार असल्याचा अंदाज आहे.
ठिबकने पाणी द्या
याबाबत मिरज कृषी विभागाचे कृषी सहायक राजू रजपूत म्हणाले की, पानमळ्याला पावसाळ्यात पाणी वाफ्याने देऊ नये. शक्यतो ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची व्यवस्था करावी. परतीच्या पावसाने वाफ्यात साचलेले पाणी त्वरित बाहेर काढून सोडल्यास पानवेलीवर या रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो.
भरपाईची मागणी
पानउत्पादक रावसाहेब चौगुले (नरवाड, ता. मिरज ) यांचे ६० गुंठे क्षेत्राचे मूळकुज रोगाने नुकसान झाले आहे. त्यांनी नुकसान झालेल्या सर्व पानमळ्याचे शासनाने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे.