भ्रूणहत्येप्रकरणी चौकशीत खिद्रापुरे दोषी
By admin | Published: April 12, 2017 12:22 AM2017-04-12T00:22:38+5:302017-04-12T00:22:38+5:30
वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची शिफारस; समितीकडून आठवड्यात अहवाल
मिरज : राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूणहत्याकांड प्रकरणात डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला विशेष समितीने केलेल्या चौकशीत दोषी ठरविण्यात आले आहे. अवैध गर्भपातप्रकरणी डॉ. खिद्रापुरेची वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची शिफारस ही समिती आरोग्य विभागाकडे करणार असल्याची माहिती मंगळवारी मिळाली.
डॉ. खिद्रापुरे याच्या चौकशीसाठी नियुक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची दुसरी बैठक मंगळवारी मिरज शासकीय महाविद्यालयात पार पडली. ही समिती एका आठवड्यात आरोग्य विभागाला चौकशी अहवाल देणार असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याचा भ्रूणकत्तलखाना उघडकीस आला. डॉ. खिद्रापुरे याने म्हैसाळ परिसरात पुरलेले १९ भ्रूण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. या भ्रूणहत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.
डॉ. खिद्रापुरे याने केलेल्या अवैध कृत्यांच्या चौकशीसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. या समितीची पहिली बैठक पंधरवड्यापूर्वी झाली होती. समितीने पहिल्या बैठकीनंतर डॉ. खिद्रापुरे याच्या म्हैसाळ येथील रुग्णालयाची पाहणी केली होती.
मंगळवारी डॉ. सापळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या दुसऱ्या बैठकीस तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. या बैठकीत खिद्रापुरे याचा अवैध वैद्यकीय व्यवसाय व आरोग्य विभागाने दिलेल्या चार मुद्द्यांवर चर्चा झाली. समितीच्या अध्यक्षा डॉ. सापळे यांनी चौकशी समितीच्या निष्कर्षाबाबत अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, चौकशीत डॉ. खिद्रापुरे दोषी ठरला असून, त्याच्याविरुद्ध आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय गर्भपात कायदा, मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक अॅक्टअंतर्गत स्वतंत्र कारवाई केली जाणार आहे. शिवाय वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्याची नोंदणी रद्द करण्याची शिफारसही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)