खिद्रापुरेची पत्नी चौकशीसाठी ताब्यात
By admin | Published: March 9, 2017 11:47 PM2017-03-09T23:47:49+5:302017-03-09T23:47:49+5:30
भ्रूण हत्याकांड; विजापूरच्या डॉक्टरसह दोघांना कोठडी
सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे महिलांचा गर्भपात करून भ्रूणहत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य संशयित डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिला गुरुवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी खिद्रापुरेच्या घरावर छापा टाकून दोन तास कसून तपासणी केली.
मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे यांचा गर्भपात करण्यासाठी वापरलेली औषधी गोळी व इंजेक्शन खिद्रापुरेने लपवून ठेवले होते, ते जप्त केले आहे. दरम्यान, अटकेतील विजापूरचा
डॉ. रमेश देवगीकर व औषधांचा पुरवठा करणारा सुनील खेडकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी
सुनावली आहे.खिद्रापुरेने गेल्या आठवड्यात स्वाती जमदाडे यांचा गर्भपात केला होता. यामध्ये स्वाती यांचा मृत्यू झाला. स्वाती यांच्या माहेरकडील लोकांनी त्यावेळी त्यांच्या पतीला बेदम चोप दिला. तसेच स्वातीच्या मृतदेहावर पतीच्या मणेराजुरीतील घरासमोरच अंत्यसंस्कार केले होते. या घटनेची तीव्रता वाढत गेल्याने पोलिसांनी गतीने तपास सुरु ठेवला. स्वाती यांच्या माहेरकडील लोकांनी त्यांचा पती व डॉ. खिद्रापुरे या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अटकेच्या भीतीने खिद्रापुरे फरार झाला होता. त्याच्या रुग्णालयावर छापा टाकण्यात आला असता, या छाप्यात अनेक आक्षेपार्ह कागपत्रे व गर्भपातासाठी लागणारी औषधे सापडली. गर्भपात केलेले भ्रूण त्याने म्हैसाळमध्ये ओढ्यालगत दफन केले होते. जेसीबीच्या मदतीने ओढ्यालगत खुदाई केल्यानंतर तेथे १९ भ्रूण सापडले. त्यामुळे हे प्रकरण राज्यभर तसेच अधिवेशनामध्येही चर्चेत आले.
दोन दिवसांपूर्वी खिद्रापुरेला अटक केली. त्याच्या ‘रॅकेट’मध्ये डॉ. रमेश देवगीकर (विजापूर). डॉ. श्रीहरी घोडके (६८, कागवाड), खिद्रापुरेच्या रुग्णालयातील सहाय्यक कांचन रोजे (शेडशाळ, ता. अथणी), उमेश साळुंखे (नरवाड) व सुनील खेडेकर (माधवनगर) या पाचजणांची नावे निष्पन्न झाल्याने त्यांनाही अटक झाली.यातील डॉ. देवगीकर व खेडेकर या दोघांना गुरुवारी दुपारी मिरज न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खिद्रापुरेची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीत त्याने स्वाती जमदाडे यांचा गर्भपात करण्यासाठी एक औषधी गोळी व इंजेक्शन दिले होते. इंजेक्शन त्याने निम्मेच वापरले होते. स्वातीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने निम्मे इंजेक्शन व गोळ्यांचे पाकीट लपवून ठेवले आहे, अशी कबुली दिली. त्यानुसार हे इंजेक्शन व पाकिटातील शिल्लक एक गोळी जप्त केली आहे. (प्रतिनिधी)
पत्नीची कसून चौकशी
खिद्रापुरेची पत्नी डॉ. मनीषा हिची कसून चौकशी सुरु आहे. पण अवैध गर्भपातासाठी पतीला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही, असे ती सांगत आहे. तरीही तिच्याकडे तपासात निष्पन्न झालेल्या विविध मुद्यांवरुन चौकशी केली जात आहे. तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
एजंटाचे नाव निष्पन्न
खिद्रापुरेच्या भ्रूणहत्या ‘रॅकेट’चे कर्नाटक ‘कनेक्शन’ अधिकच असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. तो विजापूर येथील आणखी एका डॉक्टरकडे महिलांची गर्भलिंग निदान चाचणी करुन घेत होता. या डॉक्टरला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक विजापूरला रवाना झाले आहे. खिद्रापुरेला गर्भपातासाठी रूग्ण आणून देणाऱ्या तेरदाळ येथील एका एजंटाचे नावही पुढे आले आहे. येत्या एक-दोन दिवसात आणखी काहीजणांना अटक होण्याचे संकेत आहेत.