खानापूर तालुक्यात शिवसेना, कॉँग्रेसला प्रत्येकी दोन जागा
By admin | Published: November 3, 2015 11:13 PM2015-11-03T23:13:24+5:302015-11-04T00:09:53+5:30
ग्रामपंचायत पोटनिवडणूक : आठ बिनविरोध, तर सहा जागा रिक्त
विटा : खानापूर तालुक्यातील साळशिंगे, भडकेवाडी व शेडगेवाडी या तीन ग्रामपंचायतींच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसला दोन व शिवसेनेला दोन अशा समान जागा मिळाल्या.
तालुक्यातील भाग्यनगर, साळशिंगे, घानवड, सांगोले, रामनगर, धोंडेवाडी, शेडगेवाडी, भडकेवाडी व जाधवनगर या नऊ ग्रामपंचायतींच्या १६ प्रभागातील १८ रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु, त्यातील भाग्यनगर, रामनगर, धोंडेवाडी, जाधवनगर या चार ग्रामपंचायतींच्या सहा जागांसाठी उमेदवारच मिळाला नसल्याने या जागा पुन्हा रिक्त राहिल्या आहेत, तर आठ ठिकाणी बिनविरोध निवडी झाल्या होत्या.
अर्ज माघारीनंतर तालुक्यातील साळशिंगे, भडकेवाडी व शेडगेवाडी या तीन ग्रामपंचायतीमधील चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यासाठी रविवारी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. मंगळवारी सकाळी विटा तहसील कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. त्यावेळी साळशिंगे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. ३ मधून कॉँग्रेसच्या शीतल महेंद्र जाधव यांनी शिवसेनेच्या उमेदवार उषा हणमंत जाधव यांचा पराभव केला.
भडकेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. २ मधून शिवसेनेच्या संजीवनी कुंडलिक बुर्ले विजयी झाल्या. त्यांनी कॉँग्रेसच्या शांताबाई नाथा शेंडगे यांचा पराभव केला. शेडगेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. १ व ३ साठी पोटनिवडणूक झाली. प्रभाग क्र. १ मधून शिवसेनेच्या मंदाकिनी शिवाजी दळवी यांनी कॉँग्रेसच्या उमेदवार उषाताई बाबासाहेब दळवी यांचा एका मताने पराभव केला, तर प्रभाग क्र. ३ मधून कॉँग्रेसचे बाबासाहेब सोपान दळवी यांनी शिवसेनेचे उमेदवार शिवाजी पतंगा दळवी यांचा केवळ दोन मतांनी पराभव करून अत्यंत चुरशीने विजय संपादन केला.
त्यामुळे तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींच्या चार जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत कॉँग्रेसने दोन, तर शिवसेनेने दोन जागा जिंकल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ओ. एस. उरकुडे, श्रीपाद जोशी व डी. एल. मसुगडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
सहा जागा बिनविरोध...
घानवड-परशुराम पांडुरंग रावताळे, सांगोले-विमल हणमंत करडे, अनिता भगवान कुंभार, रामनगर-सचिन कुमार थोरात, पुरुषोत्तम उत्तम थोरात, शालन विष्णू थोरात, धोंडेवाडी-मधुकर दत्तात्रय सुतार, भडकेवाडी - संजीवनी कुंडलिक बुर्ले निवडून आले आहेत. या पोटनिवडणुकीवेळी उमेदवारच मिळाला नसल्याने भाग्यनगर येथील एक, रामनगर ग्रामपंचायतीतील दोन, धोंडेवाडीमधील एक व जाधवनगर येथील दोन जागा अशा सहा जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे येथे पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार का, असा प्रश्न आहे.