खिरवडे, हत्तेगावचे पंप १ डिसेंबरपासून सुरू होणार

By admin | Published: November 16, 2015 11:33 PM2015-11-16T23:33:17+5:302015-11-16T23:58:51+5:30

शिवाजीराव नाईक : ‘वाकुर्डे’च्या आढावा बैठकीत थकबाकीदारांचा वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश

Khirwade, Hategaon pump will start from December 1 | खिरवडे, हत्तेगावचे पंप १ डिसेंबरपासून सुरू होणार

खिरवडे, हत्तेगावचे पंप १ डिसेंबरपासून सुरू होणार

Next

कोकरूड : वाकुर्डे बुद्रुक योजनेचे खिरवडे, हत्तेगाव येथील पंप १ डिसेंबर रोजी सुरू होतील. २०१३-२०१४ च्या हंगामात काही बड्या शेतकऱ्यांनी ‘वाकुर्डे’चे पाणी घेऊन वीज वितरण कंपनीची बिले जाणूनबुजून थकवली आहेत. त्यांच्या विद्युत पंपाची वीज कनेक्शन्स ताबडतोब तोडावीत, असे आदेश आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिले.
शिराळा तहसील कार्यालयात आयोजित वाकुर्डे योजना आढावा बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे होते. यावेळी शिराळाचे तहसीलदार विजय पाटील, इस्लामपूरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता टी. टी. सूर्यवंशी, जे. जे. बारदेसकर, शिराळाचे गटविकास अधिकारी, इस्लामपूरचे गटविकास अधिकारी विजय पाटील, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, अरविंद बुद्रक, विजय कांबळे, विजय पाटील प्रमुख उपस्थित होते.
नाईक म्हणाले, चांदोली धरणात यावर्षी ९३ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या पाणी साठ्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी या आढावा बैठकीचे आयोजन केले आहे. वारणा धरणातून डिसेंबर महिन्याच्या १ ते ७ तारखेला पाणी आवर्तन सुरू होणार आहे. चालूवर्षी चांदोली धरणातून एकूण पाच आवर्तनांद्वारे एकूण ३५ दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी वीज वितरणची वीज बिले देखील थकवली आहेत. त्यावेळच्या २३ लाख थकबाकीपैकी अद्याप १३ लाख बाकी असल्याने वाकुर्डे बुद्रुक योजना अशा शेतकऱ्यांमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. जे शेतकरी जुनी थकबाकी भरणार नाहीत, त्यांच्या वीज मोटारींचे कनेक्शन ताबडतोब तोडावे.
नाईक म्हणाले, कऱ्हाड तालुक्याने देखील ‘वाकुर्डे’चे पाणी मांड नदीत सोडावे. घोगाव, उंडाळे तलाव त्यामधून भरून द्यावेत, अशी मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाने ७ दिवसांचा आवर्तनाचा कालावधी वाढवून तो किमान १० दिवस तसे केल्यास वाकुर्डेचा करमजाई तलाव भरेल. करमजाई भरल्यावर पहिल्या टप्प्यात कऱ्हाड तालुक्यालादेखील पाणी मिळेल. याकरिता २० एम.सी.एफ.टी. पाण्याची आवश्यकता आहे.
यावेळी अरविंद पाटील, विजय कांबळे, विजय पाटील, सुनील पाटील, नामदेव पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)


‘वीज वितरण’चे अधिकारी धारेवर
खिरवडे व हत्तेगाव पंप हाऊसच्या दुरूस्तीसाठी त्याठिकाणी सिंगल फेज कनेक्शन वीज वितरण कंपनीने तातडीने द्यावीत, या विषयावरून आमदार नाईक वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. काहीही करा, कायदा व व्यवहार, लोकांची तातडीची गरज पाहून याठिकाणी ताबडतोब सिंगल फेज वीज कनेक्शन द्या, तुमच्यामुळे वाकुर्डे बुद्रुक योजनेत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास आपल्याला जबाबदार धरण्यात येईल. जर याबाबत कार्यवाही झाली नाही, तर जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संबंधित सर्व विभागांची बैठक बोलावण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी दिला.

Web Title: Khirwade, Hategaon pump will start from December 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.