तासगावात नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला ‘खोडा’

By admin | Published: November 4, 2015 11:26 PM2015-11-04T23:26:00+5:302015-11-04T23:56:06+5:30

वर्चस्वाचा तराजू दोलायमान : ग्रामपंचायतींसाठी भाजप-राष्ट्रवादीचा श्रेय‘वाद’

"Khoda" | तासगावात नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला ‘खोडा’

तासगावात नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेला ‘खोडा’

Next

दत्ता पाटील- तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींचा सारीपाट निकालानंतर स्थिरावला. या ग्रामपंचायतींच्या निकालावर तालुक्यातील सत्तेची आणि वर्चस्वाची समीकरणे ठरणार होती. तालुक्यावर वर्चस्व खासदार गटाचे की आमदार गटाचे, याचा फैसला होणार होता. मात्र निकालाचे एकंदरीत चित्र पाहिल्यास, वर्चस्वाचा तराजू दोलायमानच राहिला. खासदार संजयकाका पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांच्या वर्चस्वाच्या महत्त्वाकांक्षेला जनतेनेच खोडा घातल्याचे चित्र या निकालावरून दिसून येत आहे. त्यामुळेच निकालानंतरही वर्चस्व दाखवून देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांत श्रेयवाद सुरु आहे.
तासगाव तालुक्यात यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या गटातच ग्रामपंचायतींच्या लढती होत होत्या. यापूर्वी झालेल्या निवडणुकांत या दोन्ही नेत्यांचा प्रभाव असायचा. मात्र आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर, त्यांची जागा आमदार सुमनताई पाटील यांनी घेतली.
तालुक्यात काही प्रमाणात राजकीय स्थित्यंतराला सुरुवात झाली. राज्यातील सत्ताबदल आणि तालुक्यातील नेतृत्व बदलामुळे तालुक्यात नव्या राजकीय समीकरणांची गोळाबेरीज सुरु झाली. त्यातूनच आबांच्या पश्चात वर्चस्व कोणाचे? हा प्रश्न ऐरणीवर आला.
तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या. त्यापैकी १९ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. या सत्तांतरात आबा गटाबरोबरच काका गटाचेही बालेकिल्ले असणारी गावे ढासळली. यापूर्वी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर आबा गटाचे एकहाती वर्चस्व होते. त्यामुळे बाजार समितीपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत आबा गटाचेच वर्चस्व असायचे. हे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी यंत्रणा राबविली. त्यामध्ये त्यांना यशही आले. आबा गटाच्या अनेक हुकमी ग्रामपंचायती काका गटाकडे आल्या. तरीही काका गटाला तालुक्यावर एकहाती वर्चस्व मिळविण्यात अपयश आले. मात्र वर्चस्वाच्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात यश मिळाले. तालुक्यात घोंघावणारे भाजपचे वादळ थोपविण्याचे आव्हान यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर होते. राष्ट्रवादीच्या शिलेदारांनी स्वत:चे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी केलेल्या संघर्षामुळे बहुतांश ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश मिळाले.
एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीतील यश हे दोन्ही पक्षांसाठी संमिश्र ठरले, मात्र एकहाती वर्चस्व ठेवणारे निश्चितच नाही. नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेपेक्षा जनतेची महत्त्वाकांक्षा वेगळी होती. त्यामुळेच जनतेने नेत्यांपेक्षा स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत, स्थानिक सत्ताधाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.
त्यामुळेच नेत्यांच्या वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा असफल झाली. अर्थात ही महत्त्वाकांक्षा जनतेनेच फोल ठरवली आहे. तरीही बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याचा दावा करीत, दोन्ही गटांकडून वर्चस्ववादाचा आटापिटा केला जात आहे. त्यामुळे नेमके वर्चस्व कोणाचे? हे पाहण्यासाठी पुढील निवडणुकांची प्रतीक्षा करावी लागणार, हे निश्चित.


भाजपचा आलेख
पक्षाची सत्ता व खा. संजय पाटील यांचे खमके नेतृत्व यामुळे या खासदार गटाकडून तालुका काबीज करण्यासाठी यंत्रणा राबवली गेली. राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत रुसवे-फुगवे असतानाही यश आले नसले तरी, गतवेळच्या तुलनेत तालुक्यात ताकद वाढली आहे.

प्रतिष्ठेची लढाई : नेत्यांची महत्त्वाकांक्षा
खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्ह्याचे नेतृत्व हातात घेतले. या नेतृत्वाला पाठबळ मिळण्यासाठी, त्यांचे होमग्राऊंड असणाऱ्या तासगाव तालुक्यात आपलेच वर्चस्व असायला हवे, ही खासदारांची महत्त्वाकांक्षा प्रबळ झाली. दुसरीकडे आबांच्या पश्चात राष्ट्रवादीचे नेतृत्व स्वीकारलेल्या आमदार सुमनताई पाटील यांचे नेतृत्व मजबूत असल्याचे दाखवून देण्यासाठी, आबांचे तालुक्यावर असलेले वर्चस्व कायम ठेवण्याची महत्त्वाकांक्षा आमदार पाटील यांना होती. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.


राष्ट्रवादीचा आलेख
आबांच्या पश्चात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कायम ठेवण्याचे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांसमोर होते. खासदार गटाकडून आक्रमक खेळी होणार, हे गृहीत धरूनच राष्ट्रवादीचे शिलेदार सुरुवातीपासूनच तयारीनिशी उतरले होते. गतवेळच्या निवडणुकीशी तुलना करता, यावेळी राष्ट्रवादीची संख्या घटली तरी, वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादीत गड टिकवून ठेवल्याचे समाधानच अधिक आहे.

Web Title: "Khoda"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.