Sangli- कवठेमहांकाळमधील खोत टोळी दोन वर्षासाठी तडीपार; दीड वर्षांत सात टोळ्यांवर बडगा
By अशोक डोंबाळे | Published: September 9, 2023 06:55 PM2023-09-09T18:55:47+5:302023-09-09T18:56:51+5:30
सांगली : कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानु खोत टोळीला सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या ...
सांगली : कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ज्ञानु खोत टोळीला सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ही सलग तिसरी कारवाई केली. अधीक्षकांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षांत अधीक्षक तेली यांनी सात टोळ्यातील २८ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. पुढील टप्प्यात आणखी काही जणांवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
टोळीचा म्होरक्या ज्ञानु अण्णाप्पा खोत (२३, रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) याच्यासह सुरेश उर्फ अर्जुन महादेव पोतदार (२५, अग्रणी धुळगांव, ता. कवठेमहांकाळ), संदीप भारत पाटील (२०), मारूती दादासो लिंगले (२२, दोघे रा. कोंगनोळी, ता. कवठेमहांकाळ) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, की आगामी गणेशोत्सवासह विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल हाय अलर्ट झाले आहे. गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी सराईतांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोत ही टोळी ही २०२२ पासून सक्रीय होती. गाई चोरीसह अन्य गुन्हे दाखल टोळीवर दाखल आहेत. टोळीची वाढती गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तडीपारीचा प्रस्तावर सादर करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी दिले होते. त्यानुसार कवठेमहांकाळ पोलिसांनी प्रस्तावर सादर केला. त्यानंतर सुनावणी घेत अधीक्षकांनी सांगलीसह सोलापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारचे आदेश दिले. यापुढेही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
अप्पर अधीक्षक आंचल दलाल, उपाधीक्षक सुनील साळुंखे, संदेश नाईक, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, कवठेमहांकाळचे निरीक्षक ज्योतिराम पाटील, उपनिरीक्षक सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, मनिषा बजबळे यांचा कारवाईत सहभाग होता.