खरसुंडी देवस्थान विकासाच्या प्रतीक्षेत
By admin | Published: April 18, 2017 11:17 PM2017-04-18T23:17:52+5:302017-04-18T23:17:52+5:30
भाविकांत नाराजी : नाथनगरीत सुरक्षेसह सुलभ शौचालय आणि स्वच्छतेचा अभाव; समन्वयाची गरज
विक्रम भिसे ल्ल खरसुंडी
तीर्थक्षेत्र खरसुंडी (ता. आटपाडी) नगरीत येणाऱ्या भाविक-भक्तांना मूलभूत सेवा, पिण्याचे स्वच्छ पाणी, सुलभ शौचालय अशा अनेक प्रश्नांचा अभाव आहे.
तीर्थक्षेत्र खरसुंडी येथे श्री सिध्दनाथाचे हेमाडपंथी मंदिर आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आणि कुलदैवत असलेल्या या मंदिरामध्ये वर्षभर अनेक उत्सव, कार्यक्रम, वर्षाच्या बारा पौर्णिमेला कार्यक्रम आणि वर्षातून दोनदा प्रसिध्द खिलार जनावरांच्या यात्रा व सासनकाठी, गुलाल-खोबरे उधळणीची चैत्री यात्रा भरत असते. यानिमित्ताने वर्षभर भाविक-भक्तांची व यात्रेकरूंची लाखोंच्या संख्येने वर्दळ असते.
यात्रेदरम्यान ग्रामपंचायत, देवस्थान, बाजार समिती आणि प्रशासनाची नेहमीच तारांबळ उडत असते. खरसुंडी येथे चैत्री यात्रेस चार ते पाच लाख भाविक दाखल होत असतात. त्यांना पुरेशी सेवा उपलब्ध करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. मात्र श्री नाथावरील श्रध्देमुळे भाविकांतील महती कुठेही कमी झाल्याचे दिसून येत नाही. दिवसेंदिवस श्रीनाथाचे महात्म्य वाढत असून, यात्रेमध्ये भाविकांची व यात्रेकरूंची संख्या वाढतच आहे. त्यामानाने पुरेशी सेवा उपलब्ध करून देण्यास सर्वांचे प्रयत्न तोकडे पडतात.
देशाच्या काना-कोपऱ्यात प्रसिध्द असलेल्या चैत्री व पौषी यात्रेसाठी अनेक राज्यांतून श्रध्दाळू आणि व्यापारीवर्ग श्रीनाथ नगरीत येतात. मात्र गावातील या प्रसिध्द यात्रेचे नियोजन करण्यासाठी आणि जबाबदारी पेलण्यासाठी यात्रा समिती बनविणे गरजेचे आहे.
प्रत्येकवर्षी यात्रेपूर्वी काही दिवस आधी प्रांताधिकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनातील सर्व विभाग, देवस्थान, ग्रामपंचायत, पंचायत, बाजार समिती, मानकरी, ग्रामस्थांची नियोजन आढावा बैठक घेतली जाते. संबंधित सर्व विभागातील अधिकारी, पदाधिकारी नियोजन सांगतात. परंतु यात्रेचा ताण इतका मोठा असतो की, प्रत्येक विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. अनेकवेळा देवस्थान, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधला जात नसल्याने यात्रेकरूंना आणि भाविक-भक्तांना पुरेशी सेवा उपलब्ध न झाल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा अनुचित प्रकार घडून संकटाला सामोरे जावे लागते. त्यावेळी प्रशासनालाही पळापळ करावी लागते.
या नगरीचा इतर देवस्थानच्या मानाने सर्वांगीण विकास साधला जात नाही. यासाठी आमदार, खासदार, प्रशासन यांच्या इच्छाशक्तीची गरज असून, इतर देवस्थानांप्रमाणे खरसुंडी श्री सिध्दनाथ देवस्थानचा विकास साधला जावा, यासाठी खरसुंडी श्रीनाथ नगरीत प्रशासनाच्या पुढाकाराने देवस्थान, ग्रामस्थ, मानकरी आणि बाजार समिती यांची संयुक्त यात्रा समिती स्थापन केली पाहिजे. देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाकडे विकास आराखड्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भाविकांची मागणी आहे.
या भागातील भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य मंत्रिमंडळातील चांगल्या संबंधाचा उपयोग या देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी करावा, अशी जनतेतून मागणी आहे. या भागातील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख या तरुण नेत्यांनी श्रीनाथ देवस्थानचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.