पलूस तालुक्यात खरीप पिके धोक्यात
By admin | Published: July 12, 2015 11:26 PM2015-07-12T23:26:48+5:302015-07-13T00:36:44+5:30
दुबार पेरणीचे संकट : ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतातूर
किरण सावंत - किर्लोस्करवाडी -पलूस तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने यावर्षीचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाअभावी तालुक्यातील जवळजवळ ६ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर उर्वरित ३५ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. पेरणी झालेली पिके पाण्याअभावी वाळू लागल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.
तालुक्यात मान्सूनपूर्व तसेच जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात झालेला मान्सूनच्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली होती. तालुक्यातील १० हजार ५०० हेक्टर खरीप पेरणी क्षेत्रावपैकी सुमारे साडेसहा हजार क्षेत्रावर सोयाबीन, ज्वारी, भुईमूग, मूग, उडीद यांची पेरणी झाली. सुरुवातीला पाऊस चांगला झाल्याने अनेक ठिकाणी उगवणही चांगली झाली. मात्र पावसाने दडी मारली. गेल्या १० ते १२ दिवसांपासून तापमानातही कमालीची वाढ झाली. उन्हामुळे उगवून आलेली पिकेही आता दुपार धरू लागली आहेत. आधीच पावसाने मारलेली दडी आणि दुपार धरू लागलेली पिके यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यातील चार हजार हेक्टर क्षेत्र अजूनही पेरणीपासून वंचित आहे. २० जुलैपर्यंत खरीप पेरण्या होणे अपेक्षित आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने उर्वरित क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या असून, २० जुलैपर्यंत पाऊस न पडल्यास पेरणी हंगाम वाया जाणार असून दुबार पेरणी करणेही कठीण होणार आहे. बळीराजासमोर सलग दुसऱ्यावर्षीही अस्मानी संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्यावर्षीही मान्सूनने हुलकावणी दिली होती. मात्र यावेळी शेतकरी जूनच्या शेवटच्या पंधरवड्यात सलग तीन ते चार दिवस पडलेल्या पावसावर पेरणी करून अडचणीत आला आहे.
तालुक्यातील कृष्णाकाठच्या गावात पाणी पुरेसे आहे. मात्र इतर गावांत पाण्याची टंचाई आहे. पाणी पुरवठा योजना आहेत. परंतु खरीप पिकांना पाणी पुरविणाऱ्या संस्थांचे पाणी दर परवडणारे नाहीत. त्यामुळे हे पाणी खरीप पिकांना देण्याचे धाडस शेतकरी करीत नाहीत. पण पेरणी झालेल्या सोयाबीन, भुुईमूग, ज्वारी, उडीद आदी पिकांच्या वाढीस पूरक वातावरण नसल्याने वाढ समाधानकारक नाही. द्राक्षबागेचे क्षेत्र तालुक्यात मोठे आहे. आंधळी, मोराळे, बांबवडे येथील द्राक्षबागांना पाण्याची आवश्यकता आहे.