खरसुंडीत सासनकाठी सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:47 AM2019-05-03T11:47:26+5:302019-05-03T11:48:44+5:30
देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता.आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती.
खरसुंडी : देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता.आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती.
सिद्धनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी आदल्यादिवशी रात्री बारापासूनच रांगा लावल्या होत्या. गावातील सर्व रस्त्यांवरून मानाच्या सासनकाठ्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भक्तिमय वातावरणात नैवेद्यासह मंदिराकडे येत होत्या.
चौकाचौकात नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽचा जयघोष करीत भाविक खरसुंडीत दाखल होत होते. कुलदैवत सिद्धनाथाच्या पालखी, सासनकाठीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण करून नवस फेडण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
बुधवारी दुपारी दोन वाजता आटपाडीचे प्रमुख मानकरी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याहस्ते मानपान आणि विधिवत पूजा करून इतर मानकरी, सेवेकरी, ग्रामस्थ, भाविकांच्या उपस्थितीत सिद्धनाथाच्या पालखीचे जोगेश्वरी मंदिराकडे प्रस्थान झाले. यावेळी मानाच्या सासनकाठ्या पालखीबरोबर निघाल्या.
भालदार-चोपदार, छत्र-चामर, सेवेकरी, मानकरी असा सिद्धनाथाचा शाही लवाजमा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडताच सभोवताली जमलेल्या हजारो भाविकांनी नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽचा जयघोष करीत गुलाल-खोबऱ्यांची उधळण केली.
मुख्य बाजारपेठेतून सिद्धनाथाची पालखी गुलाल-खोबऱ्याची उधळण झेलत जोगेश्वरी मंदिराकडे निघाली. मंदिराच्या प्रमुख पटांगणामध्ये मानवंदना देण्यात आली. पालखी जोगेश्वरी मंदिरात दाखल होऊन मानपान व धुपारती करून पुन्हा सिद्धनाथ मंदिराकडे गेली.