तासगाव तालुक्यात नेते खुशाल; जनता बेहाल
By admin | Published: April 8, 2017 12:07 AM2017-04-08T00:07:58+5:302017-04-08T00:07:58+5:30
पाण्यासाठी होरपळ : आश्वासनांची खैरात निवडणुकीपुरतीच; पाण्याचे श्रेय घेणाऱ्या नेत्यांचे आता दुर्लक्ष
दत्ता पाटील ल्ल तासगाव
तासगाव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे थंडावले, तशी पाणी योजना आणि पाण्याचे श्रेय घेणाऱ्या नेतेमंडळींनीही सोयीस्कर पाठ फिरवली. आता उन्हाच्या तडाख्यासोबत अवघा तालुका पाणी टंचाईने होरपळून निघत आहे. मात्र निवडणुकीच्या हंगामात आश्वासनांची खैरात करणारी नेतेमंडळी खुशाल; तर शेतीचे पाणी दूरच, पण पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करणारी जनता मात्र बेहाल झाली असून, जनतेंला कोणी वालीच उरला नसल्याचे चित्र तासगाव तालुक्यात निर्माण झाले आहे.
तासगाव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या धामधुमीत पार पडल्या. निवडणुकीच्या काळात केवळ शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नच मतदारांच्या अजेंड्यावर होता. मतदानासाठी दारोदार अन् गावोगाव फिरणाऱ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना जनतेतून, केवळ पाणी कधी मिळणार? हा एकच प्रश्न विचारला जात होता. मात्र उमेदवारांसह नेत्यांनीही पोकळ आश्वासने देऊन त्यावेळी वेळ मारुन नेली. काही ठिकाणी उमेदवारांनी पदरमोड करुन कूपनलिका मारुन तात्पुरती मलमपट्टी केली. निवडणुकीच्या काळात भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवर पाणीप्रश्नावरुन जोरदार आरोप-प्रत्यारोपांची जोरदार चिखलफेक केली. तालुक्यातील दुष्काळ आणि टंचाईला विरोधी पक्षातील नेतेच कसे जबाबदार आहेत, हे पटवून देण्याचा आटापिटा केला गेला. निवडणुकीनंतर मात्र गावोगावी आश्वासनांचे ढोल पिटणाऱ्या नेत्यांचे दर्शन दुर्मिळ झाले. निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेली आश्वासने हवेत विरुन गेली. निवडून आलेले उमेदवार अद्याप विजयी हवेत आहेत, तर पराभूत उमेदवार जबाबदारी झटकून मोकळे झाले आहेत.
तालुक्यातील ३४ गावे प्रादेशिक पाणी योजनांवर अवलंबून आहेत. मात्र १० मार्चपासून तालुक्यातील सर्व प्रादेशिक योजना बंद आहेत. या योजनांचा पांढरा हत्ती पोसणे प्रशासनाला अशक्य झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी ना आमदारांनी प्रयत्न केले, ना खासदारांनी प्रयत्न केले. गेल्या महिन्याभरापासून या पाणी योजना बंद आहेत. मात्र तालुक्यातील नेत्यांनी डोळ्यावर पट्टी ओढून घेतल्यामुळे या गावांतील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. या गावांनी पाण्यासाठी टाहो फोडला असताना, प्रशासनाकडून ही गावे प्रादेशिक योजनेत समाविष्ट आहेत म्हणून टँकरला मंजुरी देली जात नाही. त्यामुळे या गावांतील जनतेची अवस्था बिकट झाली आहे.
दुसरीकडे तालुक्यातील अन्य १७ गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु करण्यात आले आहेत. या गावांनी मागणी केलेले टँकर आणि पुरवठा होत असलेले पाणी यात मोठी तफावत आहे. टँकरच्या पाण्यावर तहान भागत नसल्याने वाढीव टँकर द्यावेत, अशी मागणी होत असताना, नियमावर बोट ठेवून प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील जनतेची पाण्यासाठी दाहीदिशा अशी अवस्था आहे. मात्र तालुक्याचे नेतृत्व करणारे आमदार आणि खासदार पाणीप्रश्नावर कोणतेच भाष्य करायला तयार नाहीत. निवडणुकीच्या हंगामात पाण्याचे श्रेय घेण्याचा आटापिटा करणाऱ्या या नेत्यांकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, तालुक्याच्या जनतेची तहान कशी भागवली जाणार? हा प्रश्न कायम आहे.
टंचाईची जबाबदारी नेत्यांचीच
प्रादेशिक पाणी योजनेत समावेश असलेल्या ३४ गावांचे पाणी, महिन्याभरापासून योजनाच बंद असल्यामुळे बंद आहे. या गावांना प्रशासनाकडून टँकर देण्यासही नकार देण्यात आला आहे. मात्र गेल्या महिन्याभरात प्रादेशिक योजनेचा प्रश्न सोडविण्यासाठी ना खासदार संजयकाकांनी प्रयत्न केला, आमदार सुमनतार्इंनी प्रयत्न केला. त्यामुळे प्रादेशिकच्या गावात पाणीटंचाईची मोठी दाहकता निर्माण झाली आहे. किमान येणाऱ्या काळात तरी या नेतेमंडळींनी प्रादेशिकच्या गावांची पाणी समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाणी चोरीला कोणाचे अभय ?
पूर्व भागातील बहुतांश गावे सिध्देवाडी आणि अंजनी तलावावर अवलंबून आहेत. या दोन्ही तलावांवर सावळजसह परिसरातील गावांच्या पाणी योजना कार्यान्वित होत्या. मात्र या तलावातून बेकायदा पाणी उपसा झाल्यामुळे तलाव कोरडे झाले असून पाणी योजना बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे या गावांना पिण्यासाठी पाणीच राहिलेले नाही. राजकीय वरदहस्तातून तलावातून बेकायदा पाणी उपसा झाल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पाणी योजनांचा श्रेयवाद कोणाचा?
तालुक्यात विसापूर, पुणदी पाणी योजना आणि या योजनांच्या पाण्याचा श्रेयवाद सातत्याने चर्चेत असतो. मात्र या योजनांतून गरजेच्यावेळी पाणी पुरवठा होत नसल्यामुळे त्या कुचकामी ठरल्या आहेत. या योजना कार्यान्वित करुन पाणीसाठा आरक्षित करुन तलाव भरुन घेतल्यास निम्म्या तालुक्याचा पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र राजकीय उदासीनतेतून हा पाणीप्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र असून, या कुचकामी योजनेचे श्रेयही तालुक्यातील नेतेमंडळींचेच असल्याची भावना व्यक्त होत आहे.