Sangli: मुलीस त्रास देण्याच्या गैरसमजातून तरुणाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न, चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:40 PM2023-10-18T12:40:51+5:302023-10-18T12:41:51+5:30
पोलिसांनी केवळ चार तासांत संशयितांना अटक केली
सांगली : शहरातील सांगलीवाडी येथे मुलीला त्रास देत असल्याच्या गैरसमजातून तरुणाचे अपहरण करून त्यास लोखंडी गज आणि काठीने बेदम मारहाण करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. सचिन शिवाजी खर्जे (वय १९) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मच्छिंद्र शिवाजी खर्जे (रा. गावडे मळा, सांगलीवाडी) यांनी फिर्याद दिली होती.
पोलिसांनी तपास करत वैभव नंदकुमार साळसकर (वय ३०, रा. गवळी गल्ली, सांगली), युवराज सदाशिव जाधव (३७), आकाश सुभाष घबाडे (२२) आणि अथर्व ऊर्फ बबलू विजय वायदंडे (३७, तिघेही रा. जाधव प्लॉट, सांगलीवाडी) यांना जेरबंद केले आहे.
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार घडला होता. जखमी सचिन खर्जे या एका संशयिताच्या मुलीस त्रास देत असल्याचा त्याला गैरसमज झाला होता. सचिन हा शहरातील शंभर फुटी रस्त्यावर असणाऱ्या एका प्लायवूड कंपनीत माल उतरविण्यासाठी आला होता. त्यावेळी संशयितांनी त्यास जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सांगलीवाडी येथील बायपास रस्त्यावर आणत त्याला लोखंडी गज, काठीने मारहाण केली होती. यात सचिन गंभीर जखमी झाला होता.
याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल होताच पथकाने केवळ चार तासांत यातील संशयितांना अटक केली. संशयितांनी जखमी सचिनचे अपहरण करून थेट त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली शहरचे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक शिवानंद कुंभार, महादेव पोवार, संदीप पाटील, गुंडोपंत दोरकर, संतोष गळवे, गौतम कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.