पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, मृतदेह जाळून लावली विल्हेवाट; सांगलीतील आष्टयामधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 01:43 PM2023-03-07T13:43:33+5:302023-03-07T13:43:56+5:30
संशयित तिघांनी खाेलीवर जाऊन ओंकारचे एका माेटारीतून अपहरण केले
आष्टा : आष्टा येथून अपहरण झालेल्या ओंकार ऊर्फ छोट्या भानुदास रकटे (वय २३, रा. आष्टा, मूळ गाव बावची, ता. वाळवा) या तरुणाचा तिघांनी मफलरने गळा आवळून खून केल्याचे रविवारी (दि.५) उघडकीस आले. संशयितांनी खून करून आष्टा येथील स्मशानभूमीत मृतदेह जाळून राखेचीही विल्हेवाट लावल्याचे समाेर आले आहे. साेमवार, दि. २७ फेब्रुवारी राेजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तिघा संशयितांना आष्टा पाेलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये सम्मेद संजय सावळवाडे (वय २६, रा. सावळवाडे गल्ली, आष्टा), भरत चंद्रकांत काटकर (३६, रा. कदम वेस, आष्टा) व राकेश संजय हालुंडे (२३, रा. आवटी गल्ली, आष्टा) यांचा समावेश आहे. सम्मेद सावळवाडे व भरत काटकर हे पाेलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
मुळचा बावची (ता. वाळवा) येथील ओंकार ऊर्फ छोट्या रकटे हा आष्टा येथील डांगे कॉलेजजवळील प्रल्हाद घस्ते यांच्या खोलीत भाड्याने राहात होता. परिसरात किरकाेळ चाेऱ्या-माऱ्या करणाऱ्या ओंकारचा काही दिवसांपूर्वी ओंकार सावळवाडे याच्या वाद झाला हाेता. तेव्हापासून संशयित त्याच्या मागावर हाेते. साेमवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता तिघांनी खाेलीवर जाऊन ओंकारचे एका माेटारीतून अपहरण केले. याबाबत ओंकारचा मित्र सूरज प्रकाश सरगर (रा. शेळके मळा, आष्टा) याने आष्टा पोलिसात फिर्याद दिली. यानंतर आष्टा पोलिस ओंकारचा शोध घेत हाेते.
तपासादरम्यान सम्मेद सावळवाडे, भरत काटकर, राकेश हालुंडे यांची नावे समाेर आली. पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, खुनाचा प्रकार समाेर आला. भरत काटकर याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली.
ओंकार यांचे सम्मेद सावळवाडे याच्यासोबत काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. या भांडणाच्या रागातून सम्मेद सावळवाडे, भरत काटकर, राकेश हालुंडे यांनी ओंकारला राहत्या खाेलीतून मोटारीत घालून सांगली रस्त्यावरील लोकमान्य शाळेजवळ नेले. तेथे त्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मफलरने गळा आवळून त्याचा खून केला. खुनानंतर मोटारीतून मृतदेह आष्टा येथील स्मशानभूमीत आणला व जाळून त्याच्या राखेचीही विल्हेवाट लावली.
पोलिस निरीक्षक अजित सिद, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक प्रशांत निशाणदार, मनमित राऊत, महेश गायकवाड, चेतन महाजन, सचिन धोत्रे, कुबेर खोत, संदीप नलवडे, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, संजय कांबळे, सुधीर गोरे, सागर टिंगरे, दीपक गायकवाड, प्रशांत माळी, अभिजित धनगर, अवधूत भाट, नितीन पाटील, प्रवीण ठेपणे व सूरत थोरात यांनी या प्रकरणाचा तपास केला.