..म्हणून चुलत्यानेच केले पुतण्याचे अपहरण, नात्यातील एकाला दिली पाच लाखांची सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 12:27 PM2022-01-08T12:27:22+5:302022-01-08T12:30:44+5:30
पृथ्वीराज शाळेत जाताना ‘आईकडे माडग्याळ गावी सोडतो’, असे सांगून चाैघांनी त्याचे अपहरण केले.
संख : मृत भावाची संपत्ती हडपण्यासाठी पाच लाखाची सुपारी देऊन चुलत चुलत्याने पुतण्याचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. सोलापूर जिल्ह्यातून अपहरण केलेल्या माडग्याळ (ता. जत) येथील पृथ्वीराज सुरेश बिराजदार (वय ८) याची कुंडल (ता. पलूस) येथून सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल असून चाैघांना अटक झाली आहे. वळसंग (ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) येथील पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला.
संतोष धोंडाप्पा शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर), नितीन धोंडप्पा शेडशाळ, लक्ष्मण किसन चव्हाण, केदार बाबासाहेब निपुजे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पृथ्वीराजचा चुलत चुलता रमेश भीमगोंडा बिराजदार (रा. लोहगाव, जि. विजयपूर) याच्यावरही गुन्हा दाखल आहे.
पृथ्वीराज बिराजदार मूळचा लोहगाव (जि. विजयपूर) येथील आहे. त्याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे आई गौरव्वा व दोन बहिणींसह तो माडग्याळ येथे मामाकडे राहण्यास आला होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या आईने बहीण सरुबाई येरगल (रा. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर) यांच्याकडे त्याला शिक्षणासाठी ठेवले होते. पृथ्वीराजचे वडील सुरेश बिराजदार यांच्या पश्चात मोठी संपत्ती आहे. ती हडपण्याचा डाव रमेशने आखला.
यासाठी नात्यातील संतोष शेडशाळ याला अपहरणासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली. दि. ३० डिसेंबररोजी धोत्री येथून सकाळी साडेसहाच्या सुमारास पृथ्वीराज शाळेत जाताना ‘आईकडे माडग्याळ गावी सोडतो’, असे सांगून चाैघांनी त्याचे अपहरण केले. दुपारी तो घरी न आल्यामुळे नातेवाईकांनी वळसंग (जि. सोलापूर) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस पथकाने त्याचा शोध सुरू केला.
संतोष नातेवाईक असल्यामुळे चाैकशीचा बहाणा करत पृथ्वीराजच्या आईला वारंवार फोन करत होता. यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अपहरण केल्याची कबुली दिली. तो कुंडल येथे कामाला असल्याने त्याने पृथ्वीराजला तेथे ठेवले होते. पोलिसांनी कुंडल येथून नितीन शेडशाळ, लक्ष्मण चव्हाण, केदार निपुजे यांना पृथ्वीराजसह ताब्यात घेतले.
माडग्याळमध्ये जल्लोष
पृथ्वीराजला माडग्याळ येथे मामाच्या गावी पोलिसांनी आणल्यानंतर ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. सरपंच आपू जत्ती, सांगली बाजार समितीचे तज्ञ संचालक विठ्ठल निकम यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार करण्यात आला.