तीन लाखांसाठी तरुणाचे अपहरण, सांगलीत थरारक पाठलागानंतर दोघे खंडणीबहाद्दर जेरबंद
By घनशाम नवाथे | Published: April 1, 2024 01:24 PM2024-04-01T13:24:41+5:302024-04-01T13:24:57+5:30
तुकडे करून टाकण्याची धमकी
सांगली : येथील तरुण व्यावसायिकाचे भर दुपारी अपहरण करून व्हिडीओ कॉल करून मित्राकडे तीन लाखांची खंडणी दे, नाहीतर तुकडे-तुकडे करून मारून टाकतो अशी धमकी दिल्याचा प्रकार शनिवारी घडला. सांगली शहर पोलिसांनी दोघांचा सायंकाळपासून माग काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पहाटे अडीचच्या सुमारास वालचंद महाविद्यालयासमोर मोटारीचा थरारक पाठलाग करून नीलेश बाळासाहेब गालिंदे (वय ३०, रा. आनंद टॉकीजसमोर, गावभाग), मनोज मोहनसिंग दुबे (वय ३२, रा. सहावी गल्ली, वारणाली) या दोघांना जेरबंद केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी सूरज बाळासाहेब पाटील (वय ३०, हरिपूर रस्ता, पाटणे प्लॉट, सांगली) यांचा मोबाइल विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित नीलेश आणि मनोज या दोघांची ओळख होती. नीलेश आणि मनोज या दोघांनी शनिवारी दुपारी दीड वाजता सूरज यास जबरदस्तीने मोटार (एमएच ०९ एजे ९९७०) मध्ये बसवून भोसे (ता. मिरज) येथे नेले. तेथील तलावाकडे नेऊन सूरज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
अंगावरील कपडे काढून तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली. मनोज याने सूरज यांचा मित्र विनायक आंबी (रा. शंभर फुटी रस्ता) याच्या मोबाइलवर व्हिडीओ कॉल केला. कॉलवर सूरज याचे कपडे काढून खाली बसवल्याचे दाखवले. तो जिवंत पाहिजे असेल तर तीन लाख रुपये खात्यावर टाक, नाहीतर त्याचे तुकडे तुकडे करून मारून टाकीन, अशी धमकी दिली.
आंबी यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तत्काळ पीडित तरूणाची सुटका करण्याचे आदेश दिले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक महादेव पोवार आणि पथकाने तांत्रिक तपासातून माग काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भोसे, अंकली, हातकणंगले, दानोळी या मार्गांवर चकवा दिला.
रात्री उशिरापासून पोलिस पथक मागावर होते. मध्यरात्रीनंतर पहाटे अडीचच्या सुमारास संशयित मिरजेहून पुन्हा सांगलीकडे येत असल्याची माहिती मिळाली. तेव्हा वालचंद महाविद्यालयासमोर थरारक पाठलाग करून नीलेश आणि मनोजची मोटार अडवली. दोघांना ताब्यात घेत सूरज यांची सुटका केली. गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली.
चकवा देऊनही अखेर पकडले
अपहरणकर्ते सायंकाळपासून चकवा देत होते. तरीही पोलिसांनी चिकाटीने तपास सुरू ठेवला. उपनिरीक्षक पोवार, कर्मचारी सचिन शिंदे, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, रफिक मुलाणी, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने अखेर पहाटे मोहीम फत्ते केली