सांगलीतील बेणापूरच्या तरुणाचे निवडणुकीच्या वादातून अपहरण, दोन संशयितांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 02:11 PM2022-12-06T14:11:47+5:302022-12-06T14:12:13+5:30
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर दिले सोडून
विटा : खानापूर तालुक्यातील बेणापूर-विठ्ठलनगर येथील उदय आनंदराव भोसले (वय ३८) या तरुणाचे अपहरण पैशाच्या वादातून नव्हे तर बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या वादातून झाल्याचा अपहृत पीडित तरुणाने पोलिसांत जबाब दिला आहे. यात चौघांचा समावेश असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
विटा पोलिसांनी गोरख तुकाराम माने (वय ४३, रा. करंजे, ता. खानापूर) व गोविंद देवाप्पा महानवर (वय ४८, रा. पाचेगाव, ता.सांगोला) या दोघांना अटक केली आहे. मुख्य संशयित गब्बर उर्फ प्रताप ज्ञानू करचे (रा. पाचेगाव), मिथून घाडगे (रा. हतीत, ता. सांगोला) हे दोघेजण फरार आहेत.
विठ्ठलनगर (बेणापूर) येथील उदय भोसले या तरुणाचे दि. १ डिसेंबर रोजी खानापूर येथील यश कॉम्प्युटर सेंटर येथून भरदिवसा अपहरण झाले होते. याप्रकरणी पत्नी छाया भोसले यांनी गब्बर उर्फ प्रताप करचे याच्यासह अनोळखी तरुणांविरूद्ध विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना अपहरणाच्या तिसऱ्या दिवशी उदय भोसले हे खानापूर पोलिस दूरक्षेत्रात आले. त्यावेळी त्यांचा पोलिसांनी जबाब घेतला. मी बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी खानापूर येथील कॉम्प्युटर सेंटरमध्ये आलो असताना गब्बर करचे व त्याच्या साथीदारांनी माझे दुचाकीवरून अपहरण केले. त्यांनी मला मोटारीतून टेंभुर्णी, मोडनिंब परिसरात नेले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर त्यांनी मला सोडून दिले. मी बेणापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरू नये, यासाठी चौघांनी माझे अपहरण केल्याचे उदय भोसले यांनी पोलिसांना सांगितले.
याप्रकरणी गोरख माने व गोविंद महानवर यांना अटक केली असून गब्बर करचे व मिथून घाडगे हे फरार आहेत. घटनेत वापरलेली मोटार (क्र. एम.एच.-०९-ईजी-०३३८) पोलिसांनी जप्त केली आहे. अटक केलेल्या दोघांना विटा न्यायालयात हजर केले असता त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध काय?
अपहरण करणारा मुख्य संशयित गब्बर हा सांगोला तालुक्यातील पाचेगाव येथील आहे. उदय भोसले यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरू नये म्हणून अपहरण केले असेल तर संशयित गब्बर करचे हा सांगोला तालुक्यातील असताना त्याचा खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध काय? असा सवाल बेणापूरचे ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत