Sangli: दारात फटाके फोडू नका म्हणताच केला निघृण खून; दोघा भावांसह आईला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:06 PM2024-11-05T17:06:20+5:302024-11-05T17:06:46+5:30
येळावी : ‘मुलाला किडनीचा त्रास आहे, धुराने त्रास होईल, त्यामुळे दारात फटाके फोडू नका’, असे सांगणाऱ्या दीपक जयसिंग सुवासे ...
येळावी : ‘मुलाला किडनीचा त्रास आहे, धुराने त्रास होईल, त्यामुळे दारात फटाके फोडू नका’, असे सांगणाऱ्या दीपक जयसिंग सुवासे (वय २६, रा. येळावी, ता. तासगाव) याचा दोघा भावांनी कोयत्याने, धारदार शस्त्राने वार करून खून केला. दीपावली पाडव्याला रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी संशयित सुरज उर्फ विश्वजीत सावकार मोहिते (वय २१), इंद्रजीत उर्फ लाल्या सावकार मोहिते (वय २०), सुगंधा सावकार मोहिते (रा. येळावी) या तिघांविरूद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांना अटक केली आहे. येळावी येथे मोहिते व सुवासे कुटुंबीय शेजारी राहतात. त्यांच्यात जागेच्या कारणावरून आणि गटारीचे पाणी तुंबण्याच्या कारणावरून वारंवार वाद होता. गावातील तंटामुक्त गाव समितीकडेही हा वाद गेला.
शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दीपावली पाडव्याच्या दिवशी इंद्रजीत व विश्वजीत मोहिते हे भाऊ दारात फटाके उडवत होते. यावेळी दीपक सुवासे तिथे आला. त्याने ‘घरात लहान मुले आहेत. मुलास किडनीचा त्रास आहे, त्याला धूर सहन होत नाही’, अशी विनंती करून फटाके लांब उडवण्यास सांगितले. इंद्रजीत याने ‘आज दिवाळी आहे, आम्ही फटाके उडवणारच’, असे म्हणत शिवीगाळ केली. दीपकचा भाऊ आकाश हादेखील समजावून सांगू लागला. त्यातून वाद सुरू झाला. विश्वजीत हा कोयता घेऊन आला, सुगंधा यांच्याकडे काठी होती. इंद्रजीतने दीपक व आकाश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुगंधा हिने काठीने मारहाण केली. विश्वजीतने कोयत्याने पाठीवर वार केला. यावेळी काहीजणांनी वाद सोडवला.
जखमी दीपक, भाऊ आकाश व दीपकची पत्नी मयुरी हे तिघेजण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास निघाले. तेव्हा विश्वजीत याने तेथे येऊन दीपकला दुचाकीवरून ओढून खाली पाडले. इंद्रजीतने धारदार शस्त्राने दीपकच्या पाठीत वार केला. आकाश सोडवण्यास आला असता त्याच्या हातावर, मनगटावर विश्वजीतने वार केले. तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
हल्ल्यात गंभीर जखमी दीपक याला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून पुढे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक बनली होती. उपचार सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
मिरज सिव्हिलमधील डॉक्टरांनी तासगाव पोलिसांना हा प्रकार कळवला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत दीपकची पत्नी मयुरी यांनी तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिघांना अटक केली आहे. उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी भेट देऊन तासगावचे निरीक्षक सोमनाथ वाघ यांना तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. सहायक पोलिस निरीक्षक बी. एन. काबुगडे तपास करीत आहेत.
परिसरात हळहळ
संपूर्ण गाव दीपावलीच्या आनंद घेत असताना दारात फटाके उडवू नका, असे सांगितल्याने किरकोळ कारणावरून वाद झाला. त्याचे रुपांतर खुनात झाले. दीपकला दोन लहान मुले आहेत. एक सहा वर्षाचे असून, दुसरे सात महिन्याचे बाळ आहे. दीपक सेंट्रिंग काम करत होता. त्याच्या खुनामुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.