कवठेमहंकाळ-नागोळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:19 AM2021-06-05T04:19:58+5:302021-06-05T04:19:58+5:30
फोटो ओळी : कवठेमहंकाळ- नागोळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने याठिकाणी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. घाटनांद्रे : कवठेमहंकाळ- नागोळे ...
फोटो ओळी :
कवठेमहंकाळ- नागोळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने याठिकाणी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.
घाटनांद्रे : कवठेमहंकाळ- नागोळे रस्त्यावर सध्या सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या रस्त्यावरील बराच भाग हा काटेरी झुडपांनी आपल्या कवेत घेतल्याने छोटे- मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे विनाकारण अनेक जण जायबंद होत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागोळेपासून कवठेमहंकाळला जोडणाऱ्या सुमारे साडेसात कि.मी.च्या या रस्त्यावर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य आहे. अनेक ठिकाणी तर हा रस्ता काटेरी झुडपांनी आपल्या कवेत घेतला आहे. त्यामुळे अवघड वळणावर समोरचे वाहनच दिसत नाही. आपसूकच या मार्गावर अपघात होत आहेत. यातच काही ठिकाणी अगदीच रस्त्यालगत धोकादायक विहिरी आहेत. त्यामुळे हा रस्ता सध्या अपघाती क्षेत्र बनला आहे.
वाहनधारकांना या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरील खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळा सुरू होणार असल्याने प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.
कोट
कवठेमहंकाळ- नागोळे या रस्त्याचे बऱ्याच दिवसांपासून काम झाले नाही. चौकशी केली असता प्रशासनाकडून बेजबाबदारीची उत्तरे मिळत आहेत. सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. लहान- मोठे आपघात नित्याचे बनले आहेत. हा रस्ता तात्काळ दुरुस्त करणे गरजेचे आहे.
-दिलीपराव गिड्डे, शिवसेना तालुका उपप्रमुख कवठेमहंकाळ