बोरगावातील किंगमेकर अशोकअण्णा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:33 AM2021-09-08T04:33:04+5:302021-09-08T04:33:04+5:30
सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ ...
सहकाराचा महामेरू, गोरगरिबांचे आधारवड, बोरगावच्या राजकीय पटावरचे किंगमेकर, दूरदृष्टीचे नेतृत्व अशोकराव धोंडिराम पाटील ऊर्फ अशोकअण्णा यांचा आज, दि. ८ सप्टेंबर रोजी प्रथम पुण्यस्मरण दिन. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनपटाचा थोडक्यात घेतलेला आढावा...
अशोकअण्णा पाटील यांचा जन्म दि. ६ जून १९५६ रोजी दानशूर व्यक्तिमत्त्व असणाऱ्या धोंडिराम पाटील ऊर्फ सावरकरदादा यांच्या कुटुंबात झाला. अशोकअण्णा यांना बालवयातच राजकारणाचे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून मिळाले. ते गावचे प्रदीर्घ काळ सरपंच व वसंतदादांचे अनुयायी म्हणून परिचित होते. सावकरदादांनी कुटुंबापेक्षा समाज व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळ घालविला. या कुटुंबाला आर्थिक अडचणीलाही सामोरे जावे लागले. कमी वयात अशोकअण्णा यांना कैटुंबिक जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाचा डोलारा सांभाळताना सवंगड्यांच्या मदतीने बैलजोडींचा पैरा करावा लागला. काळ्या आईला हिरवा शालू नेसविण्यासाठी प्रथम शेती सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी इरिगेशनची उभारणी केली. यासाठी जयवंतराव भोसले यांचे सहकार्य लाभले. अण्णा अल्पशिक्षित असतानाही सहकाराची कास धरत बंद अवस्थेकडे चाललेली बलभीम संस्था ताब्यात घेतली. या संस्थेस ऊर्जितावस्था आणत असताना राजकारणात उडी घेतली. यावेळी विद्यमान पालकमंत्री जयंत पाटील व राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील हे त्यांच्यासाठी मैलाचा दगड बनले. राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच सरपंच पदाची जबाबदारी पडली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. अण्णांच्या जीवनाला वेगळी कलाटणीच मिळाली. राजकारणाबरोबर सहकारात एक पाऊल पुढे टाकत यशवंत पतसंस्थेची स्थापना केली. ही संस्था त्यांनी जिल्ह्यात नावारूपाला आणली. बोरगाव, इस्लामपूर व ताकारी येथे शाखा काढल्या. या संस्थेस अनेक पुरस्कार मिळविले. बलभीम संस्थेचाही ब्रॅंड तयार केला. अण्णांचा संपर्क लक्षात घेऊन जयंत पाटील यांनी राजारामबापू दूध संघात अनेक वर्षे त्यांना संचालक म्हणून संधी दिली होती. तरुण पिढीला शारीरिक सक्षमतेसाठी अद्ययावत व्यायामशाळा उभारली. स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र उभारले. वाचन चळवळीचा भाग बनत वाचनालय उभारले. सहकाराच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व गरजू लोकांना आर्थिक मदत केली. जिल्ह्यात मृत सभासदांच्या वारसास मयत निधी देण्याचा पायंडा अण्णांनी राबविला. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. कोणतीही नैसर्गिक अपत्ती उभा राहिली की त्याला सढळ हाताने मदत केली. यामध्ये ते स्वत:च कोरोनाच्या महामारीचे बळी पडले. यामुळे अनेकांचे छत्र हरपले. गावच्या राजकारणात कधीच न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली. सहकाराचा महामेरू हरपला. मात्र, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र धैर्यशील पाटील व दिग्विजय पाटील अण्णांचे बंधू, पुतणे हा वारसा व वसा सध्या जपत आहेत. आज अण्णा जरी हयात नसले, तरी त्यांच्या कर्तृत्वाने ते परिसरात स्मरणात व स्मृतीत चिरंतन राहतील. अण्णांचा आज प्रथम स्मृतिदिन विविध उपक्रमांनी साजरा होत आहे.