थायलंडमधील बचावकार्यात किर्लोस्कर कंपनीचे पथक, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांची तांत्रिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 08:31 PM2018-07-10T20:31:41+5:302018-07-10T20:31:54+5:30

थायलंड येथे जंगलात गुहेतील पुरात अडकलेल्या मुलांना वाचविण्यात मंगळवारी यश आले.

Kirloskar Company's team in Prudasak Kulkarni's technical help in rescue operations in Thailand | थायलंडमधील बचावकार्यात किर्लोस्कर कंपनीचे पथक, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांची तांत्रिक मदत

थायलंडमधील बचावकार्यात किर्लोस्कर कंपनीचे पथक, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांची तांत्रिक मदत

Next

मिरज : थायलंड येथे जंगलात गुहेतील पुरात अडकलेल्या मुलांना वाचविण्यात मंगळवारी यश आले. या बचाव मोहिमेत तांत्रिक मदतीसाठी किर्लोस्कर कंपनीचे पंप, तसेच कर्मचा-यांचे पथक थायलंडला गेले होते. किर्लोस्कर कंपनीचे अभियंता, मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांच्यासह दोघे मदतकार्यात सहभागी झाले आहेत.

थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या बारा मुलांच्या बचावासाठी जगातील अनेक देशांतील मदत पथके काम करीत होती. गुहेतील पुराच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी किर्लोस्कर कंपनीच्या उच्च क्षमतेच्या पंपांचा वापर करण्यात आला. थायलंडमध्ये किर्लोस्कर कंपनीचा पंपनिर्मितीचा कारखाना असून तेथे वारंवार पुराची समस्या उद्भवत असल्याने अनेक गावात किर्लोस्कर कंपनीने पाणी उपसा करणारे मोठे पंप कायमस्वरूपी बसविले आहेत. गुहेत अडकलेल्या मुलांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात आला. मात्र संततधार पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या.

थायलंड सरकारने पंपांद्वारे पाणी उपसा करण्यासाठी भारताकडे तांत्रिक मदतीची मागणी केली होती. यानुसार किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथील किर्लोस्कर कंपनीतील डिझाईन विभागप्रमुख प्रसाद कुलकर्णी हे कंपनीच्या पुण्यातील अन्य एका अभियंत्यासोबत थायलंडला रवाना झाले. थायलंड येथील किर्लोस्कर कंपनीच्या कर्मचा-यांच्या पथकासोबत प्रसाद कुलकर्णी मदतकार्यात सहभागी झाले. मदतकार्य सुरू असलेल्या ठिकाणी जंगलात विद्युतपुरवठा नसल्याने जनरेटरच्या साहाय्याने पाणी उपसा करणारे पंप अखंड सुरू ठेवण्याचे काम किर्लोस्कर कंपनीच्या पथकाने केले. 
इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसह अनेक देशात किर्लोस्कर कंपनीचे कारखाने असून कंपनीचे पंप अनेक देशात पूरनियंत्रणासाठी वापरण्यात येत असल्याचे कंपनीचे मनुष्यबळ विभागप्रमुख रमेश विजापूर यांनी सांगितले. कृष्णा खोरे प्रकल्पातील ताकारी, म्हैसाळसह अन्य सिंचन योजनांसाठीही किर्लोस्कर कंपनीच्या पंपांचा वापर सुरू आहे. मदतकार्यासाठी तांत्रिक मदतीच्या मागणीमुळे मिरजेतील प्रसाद कुलकर्णी यांच्यासह दोघांना शुक्रवारी तातडीने थायलंडला पाठविण्यात आले. शनिवारी सायंकाळपासून कुलकर्णी सहकाºयांसोबत मदतकार्यात सहभागी होते. प्रसाद कुलकर्णी व त्यांच्या पथकाच्या कामाचे सोशल मीडियावरून कौतुक सुरू आहे. कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही. मात्र मिरजेतील मित्रांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी थायलंडमधील बचावकार्याची माहिती दिली.

अखंड पाणी उपसा
यांत्रिकी (मेकॅ निकल) अभियंता असलेले प्रसाद कुलकर्णी गेली २५ वर्षे किर्लोस्कर कंपनीत काम करीत आहेत. अन्य देशांच्या तज्ज्ञांसोबत त्यांनी व किर्लोस्कर कंपनीच्या पथकाने पाणी उपसा करणारी यंत्रणा अखंड सुरू ठेवण्याचे काम केले. अखंड पाणी उपसा करून गुहेतील पाण्याची पातळी स्थिर ठेवून पाणबुड्यांद्वारे गुहेतील मुलांना बाहेर काढण्यात यश आले.

Web Title: Kirloskar Company's team in Prudasak Kulkarni's technical help in rescue operations in Thailand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली