दिघंचीनजीक कीर्तनकारास लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:59+5:302020-12-29T04:26:59+5:30
दिघंची : उंबरगाव (ता. आटपाडी) येथील कीर्तनकार मल्लिकार्जुन ढोले महाराज यांना अनोळखी दुचाकीस्वाराने घरी सोडण्याच्या बहाण्याने लुबाडले. त्यांच्याजवळील दोन ...
दिघंची : उंबरगाव (ता. आटपाडी) येथील कीर्तनकार मल्लिकार्जुन ढोले महाराज यांना अनोळखी दुचाकीस्वाराने घरी सोडण्याच्या बहाण्याने लुबाडले. त्यांच्याजवळील दोन हजार रुपये घेऊन पोबारा केला. ही घटना शनिवारी दुपारी चार च्या दरम्यान दिघंचीनजीक घडली.
मल्लिकार्जुन ढोले महाराज हे आटपाडी येथील गोरख जरे यांच्याघरी पारायण करून दिघंचीत आले. येथून उंबरगावला जाण्यासाठी ते दिघंची बस स्थानकात वाहनांची वाट पाहत उभे होते. यावेळी तेथे दुचाकीवरुन आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने, तुम्हाला तुमच्या घरी सोडतो असे सांगून ढोले यांना बरोबर घेतले. दिघंचीपासून दोन कि.मी. अंतरावर गेल्यावर त्या व्यक्तीने ढोले यांच्याकडे दोन हजार रुपये सुटे मागितले. यावेळी ढोले यांनी आपल्या खिशातील सुटे पैसे त्याला दिले. त्यांनी दोन हजाराची नोट मागितली असता, तुम्हाला घरी गेल्यावर दोन हजाराची नोट देतो असे त्याने सांगितले. काही अंतरावर गेल्यावर पुजारवाडी रस्त्यावर त्याने गाडी उभी केली. ढोले यांनी विचारणा केली असता, त्याने पैसे देण्याच्या बहाण्यातून ढोले यांना गाडीवरून खाली उतरवले आणि त्यांना धक्का देऊन पसार झाला. या घटनेने दिघंची व उंबरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.