किसान रेल्वेमुळे छोट्या स्थानकांचे शेती उत्पादनांच्या लोडिंग हबमध्ये रूपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:08+5:302020-12-16T04:40:08+5:30
सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, बेलापूर व मोडलिंब ही वस्तू किंवा पार्सल वाहतूक नसलेली स्थानके आहेत. मात्र सांगोला-मुझफ्फरपूर किसान रेल्वे व ...
सांगोला, बेलवंडी, कोपरगाव, बेलापूर व मोडलिंब ही वस्तू किंवा पार्सल वाहतूक नसलेली स्थानके आहेत. मात्र सांगोला-मुझफ्फरपूर किसान रेल्वे व बंगळुरू - आदर्श नगर दिल्ली किसान रेल्वेस सांगोला व जेऊरसारख्या लहान स्थानकात थांबे देण्यात आले आहेत. छोट्या स्थानकात थांब्यांमुळे डाळिंब, पेरू, सीताफळे, केळी, इतर फळे, भाजीपाला व मासे देशातील विविध शहरांत जात असल्याने छोट्या शेतकऱ्यांच्या नाशवंत शेती उत्पादनांच्या विक्रीस मदत होत आहे. सोलापूर विभागात छोट्या स्थानकांवर किसान रेल्वेतून शेती उत्पादने मोठ्या शहरात जात असल्याने स्थानक परिसरातील शेतकऱ्यांचा फायदा होत आहे.
सांगोला हे लहान स्थानक तीन किसान रेल्वेचे मोठे लोडिंग केंद्र बनले आहे. ऑगस्टमध्ये किसान रेल्वे सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण ८,३२५ टन फळांची वाहतूक सांगोला स्थानकातून झाली आहे. सांगोला-मुझफ्फरपूर किसान रेल्वे सुरू झाल्यापासून बेलवंडी १७५ टन, कोपरगाव ३३६ टन व बेलापूर १६५ टन या इतर लहान स्थानकांवरही शेती उत्पादनांचे लोडिंग झाले आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात जेऊर या छोट्या स्थानकातून यापूर्वी कोणतीही पार्सल लोडिंग सेवा नव्हती. मात्र बंगळुरू-आदर्शनगर, दिल्ली किसान रेल्वे सुरू झाल्याने या स्थानकाच्या परिसरातील शेतकऱ्यांना संधी मिळाली. किसान रेल्वेच्या सहा फेऱ्यांत जेऊरमधून ५७८ टन फळे भरली. या भागातील शेतकरी जेऊर येथे किसान रेल्वेच्या थांब्यामुळे आनंदित आहेत. आजवर उशिरा वितरण, जास्त वाहतूक खर्च व जादा वेळेमुळे डाळिंब व सीताफळ यासारखी फळे खराब होऊन नुकसान हाेत होते. सोलापूर करमाळा तालुक्यातील जेऊरजवळील शेटफळ गावातील शेतकरी विजय लबडे यांनी, किसान रेल्वेमुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, किसान रेल्वेमुळे जेऊर परिसरातील शेतकऱ्यांना दिल्ली व उत्तर भारतात पुरवठा साखळी उभारण्यास मदत झाली आहे.
फाेटाे : १५१२२०२० मिरज ३