पतंगरावांची बॅटिंग आणि मॅचफिक्सिंग...
By Admin | Published: May 28, 2017 11:45 PM2017-05-28T23:45:36+5:302017-05-28T23:45:36+5:30
पतंगरावांची बॅटिंग आणि मॅचफिक्सिंग...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : तीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत मंत्र्यांच्या अंगावर धावून जाणारा आमदार पाहिला नाही. संभाजी पवारांची विधिमंडळ आणि मंत्रिमंडळ या दोघांनाही धास्ती वाटत होती. सांगलीच्या पैलवानाला कोण आवरणार, यावर मंत्रिमंडळात चर्चाही झाली. शेवटी ही जबाबदारी माझ्यावर सोपविली. संभाजी पवारांना मी घरी बोलाविले. आधी माझ्याशी चर्चा व्हायची, मग विधिमंडळात पवार प्रश्न करायचे आणि मी घोषणा करायचो, असे आमचे मॅच फिक्सिंग ठरलेले! अशा शब्दात रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जोरदार बॅटिंग केली.
निमित्त होते, संभाजी पवार यांच्या अमृतमहोत्सवी जीवन गौरव समारंभाचे! सांगलीच्या तरुण भारत क्रीडांगणावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत संभाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. पतंगराव कदम यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना राजकीय टोलेबाजीही केली. कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत व पवारांचे कट्टर विरोधक आमदार जयंत पाटील यांनाही त्यांनी नाव न घेता चिमटे काढले. कदम म्हणाले की, संभाजी पवार थेट मंत्र्यांच्या अंगावर धावून जात. ते धास्ती वाटणारे आमदार होते. एकदा मंत्रिमंडळात चर्चा झाली, संभाजी पवारांना कोण आवरायचे? अखेर सांगलीच्या या पैलवानाला सांगलीच्या मंत्र्यांनी आवरायचे, असे ठरले. पवारांचा कुठलाही प्रश्न असो, उत्तर पतंगरावच देतील, असे ठरले. मी त्यांना घरी बोलावून घेतले. तुम्हाला काय पाहिजे, ते आधी सांगा, मी दणादण आदेश देतो, असे पवारांना सांगितले. त्यानंतर आमचे मॅच फिक्सिंग सुरू झाले.
देशात, राज्यात दबदबा असलेल्या वसंतदादांच्या सांगलीतून संभाजी पवार निवडून आले. हा कोण पैलवान आमदार झाला, हे पाहण्यासाठी मीसुद्धा मारुती चौकात येऊन त्यांची भेट घेतली. पवार निवडून आल्यानंतर अपघाताने आमदार झाले, असे काँग्रेसवाले म्हणत. हा कुठला अपघात? पवार तर चारवेळा आमदार झाले. मदन पाटील व ते एकत्र आल्यावर बरं वाटलं, पण तेव्हा दिनकरतात्या विजयी झाले. मिरजेतून तर आमचे हाफिज धत्तुरे नशिबाने आमदार झाले. मी व प्रकाशबापूंनी दुसऱ्याचे नाव फायनल करून दिल्लीला पाठविले होते. तुमचे एक तिकीट कापल्याचा दूरध्वनी रात्री दिल्लीतून आला. सकाळी धत्तुरे माझ्या घरी आले. माझी त्यांची ओळखही नव्हती. त्यांना उमेदवारी मिळाली म्हटल्यावर धत्तुरेंना हार घातला आणि दोन लाख रुपये दिले. तेही निवडून आले. याला म्हणतात नशीब! असे म्हणताच उपस्थितांत हशा पिकला.
यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, शरद पवार यांच्या काळात राज्यमंत्र्यांचा धाक असायचा, पण आता परिस्थिती बदलली आहे. आमदार, मंत्र्यांना कोणी विचारतच नाही, अशी खंत व्यक्त करीत सदाभाऊ भाग्यवान आहेत. शेतकऱ्याचा पोरगा मंत्री झाला, सदाभाऊ काही तरी करतोय, असे म्हणत चिमटा काढला. मतदारसंघातील वन अकादमीचा किस्सा सांगताना गुजरातसह सात राज्यांची वनअकादमी सांगलीला आणली. तेव्हा आर. आर. पाटील यांनी प्रश्नांकित चेहऱ्याने माझ्याकडे पाहिले. आपल्याकडे जंगल आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर मी त्यांना गप्प बसण्यास सांगितले, असे म्हणत पतंगरावांनी सुधीर गाडगीळ यांच्याकडे कटाक्ष टाकत ‘गाडगीळसाहेब गुजरातही त्यात आहे’, असा टोला लगाविला.
गोपीनाथ मुंडे असते तर संभाजी पवार आज कुठल्या कुठे गेले असते, असे म्हणताच उपस्थितांनी त्याला मोठी दाद दिली. पलूस-कडेगाव मतदारसंघात माझ्याविरुद्ध प्रचार करण्यासाठी संभाजी पवार येत. पण ते कडक बोलत नसत. नाही तर माझी पंचाईत झाली असती, अशी कबुली देताच पुन्हा हशा पिकला.
पतंगराव कदम म्हणाले की, सत्ता येते-जाते, देशात भाजपचे दोन खासदार होते, आता ते बहुमताने सत्तेत आहेत. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. त्यामुळे जनतेसोबत रहा, जमिनीवर पाय ठेवून काम करा, असा वडिलकीचा सल्लाही दिला.
सदाभाऊंचा जयंतरावांना टोला
सभेत सदाभाऊ खोत यांनी जयंतरावांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, राजारामबापूंचे सरसेनापती म्हणून संभाजीआप्पा सांगलीच्या मातीत लढले. राजारामबापूंच्यानंतर सोन्याचा चमचा घेऊन राजकारणात आलेल्यांना आप्पांनी मोठ्या मनाने खांद्यावर घेतले. सांगलीत वाजत-गाजत आणले. पण त्यांचे पाय वाढल्यावर, उंटाप्रमाणे ते पवारांच्या खांद्यावरून निसटून निघून गेले. ते गेले असले तरी, आजही पवारांचे नाव जनतेच्या मनात कायम आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
मुख्यमंत्री पदाची सल
राजकारणात नशीब असावे लागते, असे सांगताना त्यांनी, हाफिज धत्तुरे, दिनकर पाटील यांच्या निवडणुकीचे दाखले दिले. तेव्हा नशीब नव्हे प्रयत्न करावे लागतात, असे एकाने व्यासपीठावरून म्हणताच पतंगराव म्हणाले की, कसले प्रयत्न?, माझे नाव तीनवेळा मुख्यमंत्री पदासाठी आले आणि मागे गेलेही! नशीब लागतेच, असे म्हणत मनातील सल त्यांनी बोलून दाखविली.
कळलेच नाही : त्रिकुट फुटले कसे?
एकेकाळी संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की व प्रा. शरद पाटील या त्रिकुटाचा जिल्ह्यात दबदबा होता. त्याचा संदर्भ देत पतंगराव कदम म्हणाले की, हे त्रिकुट कसे फुटले, कधी फुटले, हेच मला आजवर कळाले नाही. मला सर्व विषय समजतात, पण हा विषय कधी समजलाच नाही. सर्वोदय कारखान्याच्या उद््घाटनाला मी उपस्थित होतो. या कारखान्याला कुणी परवाना दिला, तो कुणी उभारला, पवार व पाटील यांना कोणी टांग मारली, यावर मी अधिक भाष्य करणार नाही, असे म्हणत अधिक बोलणे टाळले.