नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात पतंगरावांचे कार्य आदर्शवत
By admin | Published: December 10, 2014 10:56 PM2014-12-10T22:56:42+5:302014-12-10T23:56:13+5:30
अरुण पाटील : कडेगावात राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप
तोंडोली : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये राज्य शासनाच्यावतीने डॉ. पतंगराव कदम यांनी पाच वर्षात महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकरी, सामान्य माणूस यांच्या विकासाचा हेतू समोर ठेवून नियोजनबद्धरित्या केलेले कार्य म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचा आदर्श पॅटर्न आहे, असे मत शिवाजी विद्यापीठ भूगोल अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण पाटील यांनी व्यक्त केले.
कडेगाव येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयात महाराष्ट्र भूगोल शास्त्र परिषद, पुणे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापन’ या विषयावरील तीनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य एम. एस. खोत होते.
या चर्चासत्रात नीलाद्री दास (बडोदा) यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनाचा इतिहास व संकल्पना’, डॉ. रवींद्र जायभाय यांनी ‘आपत्ती व्यवस्थापनात सुदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर’, डॉ. प्रवीण सप्तर्षी (पुणे) ‘बदलते पर्यावरण व नैसर्गिक आपत्ती’, डॉ. आडवितोट एस. सी. (अक्कलकोट) यांनी ‘दुष्काळी भागाच्या विकासावर पर्यटनाचा होणारा परिणाम’, डॉ. चंद्रकांत माने (पाटण) यांनी ‘देशाच्या आर्थिक विकासात पर्यटन उद्योगाचे स्थान’, डॉ. शशिकांत कुमार (बडोदा) यांचे ‘नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी वापरावयाची आधुनिक तंत्रे’, डॉ. बी. एन. गोफणे यांचे नैसर्गिक आपत्ती काळात घ्यावयाची खबरदारी व उपाय, संपतराव पवार यांचे दुष्काळ कमी करण्यासाठी जलनियोजन व जलव्यवस्थापन व पर्यावरण रक्षण’ या विषयावर, अशी मान्यवरांची व्याख्याने झाली.
देशभरातील ९२ संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. याप्रसंगी भूगोलशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. ज्योतिराम मोरे, प्रा. डॉ. चंद्रकांत माने, प्रा. एस. व्हाय. कारंडे, डॉ. संपत जगदाळे, डॉ. के. आर. जाधव यांची भाषणे झाली. प्रा. एस. ए. माळी व प्रा. कोळेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. एच. एस. माने यांनी आभार मानले. चर्चासत्रासाठी प्राचार्या डॉ. सौ. एस. व्ही. कुलकर्णी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)