पतंगरावांचा राजकीय सत्तासंघर्ष अन् दबदबा तब्बल सहावेळा आमदार; अठरा वर्षे मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:09 AM2018-03-10T01:09:42+5:302018-03-10T02:21:36+5:30

पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले.

Kittangarva's political power struggle and six-time MLA; Minister for eighteen years | पतंगरावांचा राजकीय सत्तासंघर्ष अन् दबदबा तब्बल सहावेळा आमदार; अठरा वर्षे मंत्री

पतंगरावांचा राजकीय सत्तासंघर्ष अन् दबदबा तब्बल सहावेळा आमदार; अठरा वर्षे मंत्री

Next

पूर्वाश्रमीचा भिलवडी-वांगी, तर पुनर्रचित पलूस-कडेगाव मतदारसंघ नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या मतदारसंघातील जनतेने पतंगराव कदम यांना १९८५, १९९०, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा तब्बल सहा निवडणुकांत विजयी केले. या मतदारसंघाचे प्रतिनिधी पतंगराव कदम जवळपास २९ वर्षे आमदार राहिले. यात तब्बल २० वर्षे मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पतंगराव कदम या नावाचा दबदबा राहिला. प्रचंड विकासकामांतून त्यांनी या मतदार संघाचा कायापालट केला.

मुख्यमंत्रिपदाची हुलकावणी
२००४ च्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी
झाली. डॉ. पतंगराव कदम यांनी तब्बल एक लाखाहून अधिक मताधिक्याने
विजय मिळविला. यावेळी ते मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. मात्र, त्यांना मुख्यमंत्रिपदाने पुन्हा हुलकावणी दिली आणि विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले. यावेळी कदम यांना सहकारमंत्रिपद देण्यात आले.

यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षात शंभर कोटींचा निधी
नवमहाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने नियोजन करणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात १०० कोटींचा निधी विविध योजनांवर आघाडी शासनाच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंजूर केला होता. विशेष म्हणजे यापैकी २५ कोटींहून अधिक निधी पतंगरावांनी सांगली जिल्ह्यात खेचून आणला होता. या निधीतून यशवंतरावांच्या जन्मगावात म्हणजे देवराष्टÑे आणि सागरेश्वर अभयारण्यात विकासकामे झाली. पतंगरावांचा दबदबाच तेवढा होता.

१९९० ला काँग्रेसच्या तिकिटावर विजयी
पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या कामांचा अफाट आवाका आणि तिकीट न मिळूनही काँग्रेस पक्षाविषयी दाखविलेली अढळ निष्ठा बघून त्यांना १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट मिळाले. त्यावेळी पहिल्यांदा ते काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २९ जून १९९२ रोजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांच्या आवडीच्या शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी या संधीचे सोने केले. आदिवासींच्या मुलांसाठी आश्रमशाळा, त्यांना मोफत पुस्तके, शाळेतला दुपारचा आहार यासाठी तरतूद केली. एकशिक्षकी शाळा द्विशिक्षकी केल्या.

१९६८ मध्ये एस. टी. महामंडळाचे संचालक
१९६८ मध्ये यशवंतराव मोहिते परिवहन मंत्री झाले. त्यावेळी मोहिते यांनी कदम यांना १ जुलै १९६८ रोजी एस. टी. महामंडळाचे संचालक केले. २३ वर्षे वयाच्या तरुणाला मोहिते यांनी मोठी संधी दिली. त्यांना महामंडळाची इम्पाला गाडी दिली. या संधीचे सोने करीत पतंगरावांनी गाव तिथे एसटी सुरू केली. ग्रामीण व दुष्काळी भागातील हजारो तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. १९६८ ते १९७३ अशी पाच वर्षे ते संचालक राहिले.

अपक्ष म्हणून १९८०ला रिंगणात
१९८० मध्ये पतंगराव कदम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. मात्र त्यांचा पोस्टाच्या मतात पराभव झाला.

१९८५ च्या  निवडणुकीत आमदार
भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून पतंगराव कदम यांनी पुन्हा १९८५ ची विधानसभा निवडणूक लढविली आणि ३० हजार मताधिक्याने विजयी झाले. ते महाराष्ट्रात दुसºया क्रमांकाची मते घेऊन विजयी झाले. आपला माणूस आमदार झाल्याच्या आनंदात भिलवडी-वांगी मतदारसंघात त्यावेळी अक्षरश: दिवाळी साजरी झाली.

१९९५ ला पराभवाचा सामना
भिलवडी-वांगी विधानसभा मतदारसंघातून १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर १९९६ च्या पोटनिवडणुकीत मात्र कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला.

१९९९ च्या निवडणुकीत विजय आणि उद्योगमंत्री
१९९९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मात्र पतंगराव कदम काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. यावेळी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना झाला. कदम विजयी झाले. यावेळी त्यांना उद्योग व जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रिमंडळात संधी मिळाली. १९९९ ते २००३ या कालखंडात विलासराव देशमुख व २००३ ते २००४ सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी पतंगराव कदम यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते.

वन, मदत व पुनर्वसन खाते
२००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघाच्या पुनर्रचनेत भिलवडी-वांगी मतदारसंघाचे नाव पलूस-कडेगाव असे झाले. यावेळी कदम यांनी ३५ हजार ५८५ मताधिक्याने विजय मिळविला. यावेळी अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले. कदम यांच्याकडे वन, मदत व पुनर्वसन खाते आले. या खात्यालाही कदम यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. वन विभागातील रोजंदारीवरील सात हजार कर्मचाºयांना त्यांनी कायम केले. १०० कोटी वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वीपणे राबविला.
 

१२ हजार ५०० कोटींची मदत
पतंगराव कदम मदत, पुनर्वसन मंत्री असताना गारपीट, अतिवृष्टी, दुष्काळ अशी संकटे आली. त्यावेळी कदम यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली होती. या उपसमितीत नऊ मंत्री आणि सचिव होते. दर मंगळवारी तीन वाजता या उपसमितीची बैठक होत असे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार बुधवारी परिपत्रक निघत असे. या काळात १२ हजार ५०० कोटींची मदत कदम यांनी अतिवृष्टी व दुष्काळात दिली.

महसूलमंत्रीपदी संधी
डिसेंबर २००८ मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यावेळी पतंगराव कदम यांना महसूलमंत्री हे सर्वाधिक महत्त्वपूर्ण खाते मिळाले. अर्थात यावेळीही त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली.

२०१४ मध्ये गड राखला
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत संपूर्ण राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत झाले. परंतु, कदम यांनी मात्र मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आपला गड कायम राखला. त्यांचा २४ हजार इतक्या मताधिक्याने विजय झाला. राज्यात काँग्रेसची सत्ता गेली; मात्र कदम यांनी मात्र विकासकामांची गती कायम ठेवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सर्व मंत्रिमंडळात त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पतंगराव कदम या नावाचा दबदबाही कायम होता.

संकलन : प्रताप महाडिक, कडेगाव

Web Title: Kittangarva's political power struggle and six-time MLA; Minister for eighteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.