सांगलीचे महापौरपद आव्हान म्हणून स्वीकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 01:10 AM2020-02-16T01:10:21+5:302020-02-16T01:11:44+5:30
महापालिका क्षेत्रातील जनता विकासाबाबत सकारात्मक आहे. सर्वांना बरोबर घेऊन शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत.- गीता सुतार
शीतल पाटील ।
राजकारणाशी कसलाही संबंध नसताना गीता सुयोग सुतार यांच्यावर अचानक महापालिका निवडणूक लढवावी लागली. दीड वर्षातच त्यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी भाजपने सोपविली. गृहिणी ते सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहराच्या महापौर असा त्यांचा प्रवास. या नव्या आव्हानाबाबत त्यांच्याशी केलेली बातचित
प्रश्न : राजकारणाशी संबंध कधी आला?
उत्तर : माझे माहेर कवठेमहांकाळ. आमचे संपूर्ण कुटुंबच वारकरी. एक भाऊ पोलीस खात्यात नोकरीला. त्यामुळे कधी घरात राजकारणाचा विषयच निघत नव्हता. विवाहानंतर मी सांगलीत आले. सासरी मात्र राजकीय वातावरण होते, पण आपण राजकारणात येऊ, नगरसेविका होऊ, असे स्वप्न कधीच बघितले नव्हते. दीड वर्षापूर्वी अचानकच भाजपने मला प्रभाग १७ मध्ये उमेदवारी दिली. राजकारणातील ते पहिले पाऊल. तेव्हाही कुटुंबाने धीर दिला. पाठीशी राहिले. म्हणूनच नगरसेविका होऊ शकले. तसा राजकारणातील प्रवास दीड वर्षाचाच म्हणावा लागेल.
प्रश्न : महापौर होणार, असे कधी वाटले होते का?
उत्तर : नगरसेविका, महापौर या पदाचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. पण भाजपच्या नेत्यांनी मोठ्या विश्वासाने महापौरपदाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करणार आहोत.
प्रश्न : विकासकामे, फायलींचा निपटारा याचे काय नियोजन केले आहे?
उत्तर : महापालिकेतील कर्मचारी व अधिकारी वर्ग तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. सांगलीची जनता व नगरसेवकही जागृत आहेत. या साऱ्यांना विश्वासात घेऊन शहराचा कायापालट करण्याचा मानस आहे. महापालिकेचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालून भरीव कामे करण्यावर भर आहे. भाजपने पारदर्शी कारभाराचे आश्वासन दिले आहे. त्याला बांधिल राहूनच काम केले जाईल.
नदी प्रदूषण रोखणार
कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. नदीपात्रात मिसळणाºया शेरीनाल्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा विचार आहे. त्यासाठी लवकरच बैठक घेऊन नियोजन केले जाईल. नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाणी देण्याचा मानस आहे.
योजनांचा पाठपुरावा
महापालिकेच्या ड्रेनेज, पाणीपुरवठा, घरकुल अशा अनेक योजना प्रलंबित आहेत. या योजना मार्गी लावून त्याचा लाभ जनतेला देण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत.
‘स्वच्छ सांगली, सुंदर सांगली’
महापालिकेचे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ घालून भरीव विकासकामे करण्यावर भर आहे. राज्य व केंद्राकडून निधी आणण्यासाठी आमदार, खासदारांची मदत घेतली जाईल. ‘स्वच्छ सांगली, सुंदर सांगली’चे स्वप्न बाळगले आहे.