रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय, कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस साताऱ्यापर्यंतच धावणार, कारण..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 04:12 PM2022-07-01T16:12:45+5:302022-07-01T16:13:12+5:30
कोल्हापूर ते पुणे अशा प्रवासासाठी महिनाभर प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मिरज : मध्य रेल्वेच्या मिरज-पुणे मार्गावर राजेवाडी-जेजुरी-दौंड या स्थानकादरम्यान रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. ३० जून ते २७ जुलै या कालावधीत कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस साताऱ्यांपर्यंतच धावणार आहे. यामुळे कोल्हापूर ते पुणे अशा प्रवासासाठी महिनाभर प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मिरज-पुणे मार्गावर सध्या विद्युतीकरण व दुहेरीकरणाचे काम सुरू असून, दि. ३० जूनपासून राजेवाडी-जेजुरी ते दौंड या स्थानकादरम्यान रेल्वे रूळ दुहेरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
पुणे ते कोल्हापूर एक्स्प्रेस (गाडी क्र. ११४२५) पुण्याऐवजी साताऱ्यापर्यंतच जाईल. पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी एक्स्प्रेस (गाडी क्र. ११४२६) रद्द केली आहे. दि. ३० जून ते २७ जुलैपर्यंत ही गाडी बंद राहणार आहे. दुहेरीकरणाचे काम झाल्यानंतर ही रेल्वे पूर्ववत सुरू होणार आहे.