शर्यतीच्या मैदानावर कोल्हापूरचा 'हरण्या'च जिंकण्याची चर्चा, ..अन् पहिला आला तोच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 06:49 PM2022-05-23T18:49:47+5:302022-05-23T19:11:35+5:30
प्रेक्षकांनी हरण्याला अक्षरश: डोक्यावर घेतले
कवठेमहांकाळ : करोली टी ता. कवठेमहांकाळ येथील बैलगाडी शर्यतीमध्येकोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या हरण्याने शर्यत जिंकत प्रथम क्रमांकासह लाखाचे बक्षीस पटकावले. स्पर्धेत हरिपूर ता.मिरज येथील महेश बोन्द्रे यांची गाडी दुसरी आली. विजेत्यांना राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, अजितराव घोरपडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
करोली टी येथे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवा उद्योजक सुभाष सूर्यवंशी यांनी विनालाठी-काठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. सायंकाळी साडेपाच वाजता शर्यतीला सुरुवात झाली.
जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये कोल्हापूर येथील संदीप पाटील यांच्या हरण्याने शर्यत जिंकत प्रथम क्रमांकासह लाखाचे बक्षीस पटकावले. स्पर्धेत दुसरा क्रमांक हरिपूर येथील महेश बोन्द्रे यांच्या बैलगाडीने पटकवला. त्यांना सत्तर हजारांचे बक्षीस देण्यात आले. तृतीय क्रमांक अंकले (ता. जत) येथील संतोष गलांडे यांच्या बैलगाडीने पटकावला. त्यांना ५५ हजारांचे बक्षीस देण्यात आले.
ब गटात प्रथम क्रमांक कोल्हापूरच्याच सचिन पाटील यांच्या ‘पाखऱ्या’ बैलाने पटकावला. दुसरा क्रमांक रांजणी (ता. कवठेमहांकाळ) येथील जयसिंग यमगर यांच्या गाडीने, तर तृतीय क्रमांक शिरूर (ता. अथणी) येथील बाळू हजारे यांच्या गाडीने पटकावला.
शर्यतीच्या बक्षीस वितरणासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार मानसिंगराव नाईक, देवराज पाटील, अविनाश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती पवार, दत्ताजीराव पाटील, वैभव नरुटे, आयोजक सुभाष सूर्यवंशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हवा ‘हरण्या’चीच...
बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर फक्त हरण्या बैलच पहिला येणार अशी चर्चा होती आणि तोच पहिला आला. यानंतर प्रेक्षकांनी हरण्याला अक्षरश: डोक्यावर घेतले हाेते.