कोल्हापूर-तिरुपती व हुबळी-दादर एक्स्प्रेस १२ दिवस रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 04:42 PM2022-04-22T16:42:37+5:302022-04-22T16:49:25+5:30
ऐन सुट्टीच्या हंगामात दोन्ही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
मिरज : मिरज-लोंढा रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी शनिवार, दि. २३ एप्रिलपासून कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस व हुबळी-दादर एक्स्प्रेस १२ दिवस रद्द करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. ऐन सुटीच्या हंगामात दोन्ही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस दि. २३ ते दि. ४ मे व कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस दि. २४ एप्रिल ते ५ मे दरम्यान रद्द करण्यात आली आहे. हुबळी-दादर एक्स्प्रेस दि. २३ एप्रिल ते ४ मे व दादर-हुबळी एक्स्प्रेस दि. २४ ते दि. ५ मे पर्यंत रद्द करण्यात आली आहे. जोधपूर-बंगळुरू-जोधपूर, अजमेर-बंगळुरू-अजमेर व गांधीधाम-बंगळुरू-गांधीधाम एक्स्प्रेस हुबळी, विजापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे मार्गे वळविण्यात आल्या आहेत.