कोंतेवबोबलाद, कागनरीत जुगारावर छापे
By Admin | Published: April 17, 2017 11:27 PM2017-04-17T23:27:04+5:302017-04-17T23:27:04+5:30
विशेष पथकाची कारवाई : आलिशान वाहनांसह पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त
उमदी : उमदी (ता. जत) येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या कोंतेवबोबलाद, कागनरी येथील सीमेवरील जुगार अड्ड्यांवर सांगलीच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकून पन्नास लाखांच्या मुद्देमालासह २६ आरोपींना ताब्यात घेतल्याची घटना रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. उमदी परिसरातील सर्वात मोठी कारवाई आहे. विशेष पथकाच्या या कारवाईने उमदी पोलिसांचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे.
उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोंतेवबोबलाद व कागनरी हद्दीमध्ये अनेक महिन्यांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सांगलीच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर रविवारी रात्री दहाच्या सुमारास सापळा रचण्यात आला. कोंतेवबोबलाद व हिंचगेरी येथील दोन्ही जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पन्नास लाखांचा मुद्देमाल जप्त करून २६ जणांना ताब्यात घेतले. त्यांना उमदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या छाप्यात कोंतेवबोबलाद येथे तुकाराम गंगाप्पा साळी, परसाप्पा साबुहवी, प्रकाश चन्नाप्पा अगसर, रमेश बसाप्पा नुची, विशाल रवींद्र शेरखाने, श्रावण छत्रीबा सरगर, बसाप्पा महादेव तेली, बबन रामा करे, शिवाजी गरिबा भिसे, जटिंग महिबून पांडू, लक्ष्मण सिध्दाप्पा बालेकर, सलीम मौलाना जागीरदार, उमेश दशरथ व्हसमनी या तेरा जणांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
त्यांच्याकडील मुद्देमाल, दोन चारचाकी वाहने (क्र. केए २८ सी ३३३२ व केए ५३ सी ६०१२), पाच दुचाकी (क्र. केए २८ ईए ९१००, केए २८ ईएल ७७९६, केए २८ आर २४६५, केए २८ ईजे ८३२४, केए २८ एक्स ८९२८), मोबाईल व रोख रक्कम असा एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कागनरी येथेही पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तेथे १३ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये रामण्णा हनुमान दोरजळे, चितांबर सुरेश देशपांडे, अशोक शिवाप्पा जैनापुरे, सिध्दनगोंडा तोटाप्पागोंडा बिरादार, विजयकुमार धोंडाप्पा साळुंखे, इराप्पा रूदाप्पा माडगी, समीर निसारअहमद मणियार, गंगाप्पा तिमाप्पा मटुर, गोकाराप्पा सदाशिव गानिगेर, परशुराम गणपती सालगल, जब्बार हनुसाब देगनाळ, संगमेश निलाप्पा नाशी, राम तिमण्णा गोलार यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून जुगार अड्ड्याच्या ठिकाणी मिळालेले साहित्य, दोन मोटारी, असा एकूण २६ लाख ४८ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जिल्हा पोलिस प्रमुखांच्या विशेष पथकाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. यामुळे उमदी पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. कोंतेवबोबलाद चेक पोस्टपासून हाकेच्या अंतरावर इतका मोठा जुगार अड्डा चालू असताना उमदी पोलिसांना याची कल्पना नव्हती का, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)