कोरेगाव-भीमा दंगल प्रकरण: 'शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:43 PM2022-05-05T12:43:33+5:302022-05-05T12:46:39+5:30
सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकारण हिंदुत्ववादी ...
सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अकारण हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार व वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
चौगुले म्हणाले की, कोरेगाव भीमा येथील दंग्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचा कोणताही संबंध नव्हता. तरीही आधारविना प्रकाश आंबेडकर व शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या सहभागाचा आरोप केला. चौकशी आयोगासमोर ज्यावेळी लेखी म्हणणे मांडण्याची वेळ आली त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी यासंर्भात काहीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची ही दुटप्पी भूमिका समोर आली आहे. राज्यातील दलित समाजांमध्ये यामुळे गैरसमज निर्माण करण्यात आले. राज्यभर दंगली घडविण्याचे कारस्थान यामागे होते. यात राज्यातील काही संघटनांचा समावेश आहे.
तर राज्यभर मोर्च
शासनाने व पोलिसांनी आता या प्रकरणातील खऱ्या सुत्रधारांना शोधावे. जोपर्यंत त्यांना अटक होऊन कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान लढत राहणार. सुरुवातीला निवेदने देण्यात येतील. त्यानंतरही कारवाई झाली नाही, तर राज्यभर मोर्च काढण्यात येतील, असा इशारा चौगुले यांनी दिला.
'या' अधिकाऱ्यांना शांततेचे श्रेय
ते म्हणाले की, तत्कालिन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, पोलीसप्रमुख सुहैल शर्मा व अन्य अधिकाऱ्यांनी हिंदुत्ववादी संघटना तसेच दलित संघटनांची एकत्रित बैठक घेतल्यामुळे सांगलीत शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांनाही शांततेचे श्रेय जाते. घटनेनंतर लगेचच उदयनराजे यांनी आम्हाला पाठींबा दिला होता. सांगलीतील २८ दलित संघटनांनीही आम्हाला पाठींबा दर्शवून विश्वास व्यक्त केला होता.
पुणे पोलिसांचे आभार
चौगुले म्हणले की, पुणे पोलिसांनी प्रामाणिकपणे व निपक्षपातीपणाने तपास केल्याने सत्य बाहेर आले. त्यामुळे पुणे पोलिसांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी आता सुत्रधाराचा शोध घेऊन कारवाई करावी, ही अपेक्षा आहे.