मुद्रांक शुल्क सवलतीची कोटीची उड्डाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:49 AM2020-12-17T04:49:52+5:302020-12-17T04:49:52+5:30
सांगली : खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला चालना देण्यासाठी राज्य शासनाने दिलेली मुद्रांक शुल्क सवलत येत्या ३१ डिसेेंबरला संपुष्टात येत आहे. गेल्या ...
सांगली : खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला चालना देण्यासाठी राज्य शासनाने दिलेली मुद्रांक शुल्क सवलत येत्या ३१ डिसेेंबरला संपुष्टात येत आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत दस्त नोंदणीच्या माध्यमातून महसुलाने कोटींची उड्डाणे घेतली असून, योजनेतून खरेदीदारांनीही कोट्यवधी रुपयांची सवलत पदरात पाडून घेतली.
लॉकडाऊन काळात ठप्प झालेल्या व त्यानंतर मंदीचा अनुभव घेणाऱ्या बांधकाम क्षेत्राला या योजनेने मोठी चालना मिळाली. कोरोना काळात सुरुवातीच्या पाच महिन्यांत बांधकाम क्षेत्रास कोणत्याही सवलतींचा लाभ मिळाला नव्हता. सप्टेंबरमध्ये मुद्रांक शुल्क माफीमुळे घरे सामान्यांच्या आवाक्यात आली. त्यामुळे घरांच्या खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. शुल्क सवलतीने तीन टक्क्यांनी शहरी व ग्रामीण भागात घरे स्वस्त झाली आहेत. त्यामुळे बांधकाम व्यवसायातील मंदीचे ढग हटण्यास मदत मिळाली. स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारात दिवसेंदिवस वाढ होत असून, महिन्याअखेरीस त्यात मोठी भर पडण्याची शक्यता आहे.
जानेवारी ते मार्च या काळात मुद्रांक शुल्क सवलत ३ टक्क्यांवरुन २ टक्के होणार आहे. त्यामुळे सवलत काहीप्रमाणात कमी होईल. त्यामुळे डिसेंबरअखेर शुल्क भरून मार्चपर्यंत दस्तनोंदणी करता येणार असल्याने त्याचा लाभ घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे महिन्याअखेरीस अचानक मोठी दस्तनोंदणी होण्याची शक्यता आहे.
कोट
मुद्रांक शुल्क सवलतीमुळे दस्त नोंदणी वाढत आहे. शासनाच्या महसुलातही मोठी भर पडत असून, नोव्हेंबरअखेर चांगली स्थिती आहे. डिसेंबरमध्येही चांगल्या नोंदणीची शक्यता आहे. दस्तांच्या स्कॅनिंगची सर्व कामे पूर्ण झाली असून, सर्व्हरला येत असलेली अडचणही दूर झाली आहे.
साहेबराव दुतोंडे, मुद्रांक जिल्हाधिकारी, सांगली
कोट
शासनाच्या सवलतीमुळे रिअर इस्टेट क्षेत्रास चांगला फायदा मिळाला. ही शुल्क सवलत मार्चपर्यंत ३ टक्क्यांपर्यंत कायम रहावी, म्हणून आमच्या संघटनेमार्फत राज्यस्तरावर प्रयत्न चालू आहेत. या क्षेत्रावर संबंधित जिल्ह्यांचे अर्थचक्र अवलंबून असल्याने ही सवलत मार्चपर्यंत तरी कायम रहावी, अशी अपेक्षा आहे.
रवींद्र खिलारे, अध्यक्ष, क्रेडाई, सांगली
चौकट
महिनानिहाय दस्तनोंदणी व मुद्रांक शुल्क
महिना दस्त मुद्रांक शुल्क
सप्टेंबर ४०२८ १०.४८ कोटी
ऑक्टोबर ४९६५ १०.३९
नोव्हेंबर ४८९४ १०.०४
चौकट
चालू आर्थिक वर्षातील महिनाअखेर स्थिती
महिना दस्त मुद्रांक शुल्क
सप्टेंबर १६२७८ ६५.२३ कोटी
ऑक्टोबर २१२४३ ७५.६२
नोव्हेंबर २६१३७ ८५.६५