जिल्ह्यातील कोविड केंद्रे १ एप्रिलपासून पुन्हा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:25 AM2021-03-28T04:25:19+5:302021-03-28T04:25:19+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढू लागल्याने खासगी व शासकीय कोविड केंद्रे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा ...
सांगली : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढू लागल्याने खासगी व शासकीय कोविड केंद्रे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. १ एप्रिलपासून तेथे रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येणार आहेत. जिल्हाभरात पहिल्या टप्प्यात किमान २४ केंद्रे सुरू केली जाणार आहेत.
जिल्ह्यात दररोज १५०हून अधिक कोरोनाबाधित आढळू लागले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४९९ आहे. त्यातील १०० जणांची प्रकृती चिंताजनक असून, ९१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. नऊजणांना व्हेंटिलेटर लावला आहे. दररोजची रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर एप्रिल महिन्याअखेरपर्यंत रुग्णसंख्या सहा हजारांवर जाण्याची भीती आहे. त्याला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
गेल्या वर्षभरात कोविड केंद्रे म्हणून काम केलेल्या सर्व खासगी रुग्णालयांना शुक्रवारी पत्रे पाठविण्यात आली. कोविड उपचारासाठी स्वतंत्र कक्ष, बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स यांची सज्जता ठेवण्यास सांगितले आहे. जिल्हा आरोग्य विभाग मंगळवारी (दि. ३० ) त्याची पाहणी करणार आहे. त्यानंतर लगेच तेथे रुग्णांवर उपचार सुरू होतील.
पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू केले जातील. शिवाय ग्रामिण भागात सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांत उपचार सुरू केले जाणार आहेत. महापालिकेनेही आदीसागर मंगल कार्यालयासह अन्य सर्व उपचार केंद्रे सज्ज ठेवावीत अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. सध्या मिरज कोविड रुग्णालय हे शासकीय आणि अन्य चार खासगी अशा एकूण पाच रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात बारा शासकीय व बारा खासगी रुग्णालयांत उपचारांचे नियोजन आहे.
सांगलीतील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यामुळे तेथे तूर्त कोविड केंद्र सुरू केले जाणार नाही. सुमारे महिन्याभरानंतर सुरू होईल असे सांगण्यात आले.
चौकट
पुन्हा निर्बंधांचे संकेत
जिल्ह्यातील रुग्णस्थिती, उपचारांची गती, प्रतिबंधात्मक उपाय, उपलब्ध बेड व अन्य सुविधा यासंदर्भात शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. मुख्यमंत्र्यांनी कोरोनास्थितीची माहिती घेतली. केंद्रीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. जिल्ह्यातील कोरोनास्थिती सध्या आवाक्यात असली काही निर्बंधांचे संकेत देण्यात आले. यामध्ये बाजारपेठा लवकर बंद करण्यासारख्या उपायांवर चर्चा झाली.
कोट
१ एप्रिलपासून किमान २४ कोरोना केंद्रांत कोरोनाचे उपचार सुरू होतील. रुग्णसंख्या वाढत असल्याने खासगी कोविड रुग्णालयांनाही उपचार सुरू करण्यासाठी पत्रे दिली आहेत. १ एप्रिलपासून तेथे रुग्ण दाखल करण्यास सुरुवात होईल. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांतही कोविड कक्ष सुरू केले जातील.
- डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्याधिकारी