महापालिकेकडून २०० खाटांचे कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:26 AM2021-04-15T04:26:24+5:302021-04-15T04:26:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने तातडीने २२० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रात वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने तातडीने २२० खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात १२० बेड ऑक्सिजनचे असतील. बुधवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. मिरज पॉलिटेक्निक येथे कोविड रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, २१ एप्रिलपूर्वी हे हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुढाकार घेत १२० बेडचे कोविड रुग्णालय सुरू केले होते. त्यात १०० बेड हे ऑक्सिजनचे होते. त्याचा लाभ जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना झाला होता. या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले होते. आता जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महापालिका क्षेत्रातही संसर्ग वाढला आहे. त्यामुळे पुन्हा कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
मिरज तंत्रनिकेतन महाविद्यालय सध्या १०० बेडचे हे कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी बुधवारी कोविड केअर सेंटरची पाहणी केली. याच महाविद्यालयामध्ये आता १२० ऑक्सिजन बेडचे आणि १०० आयसोलेशन बेडचे कोविड रुग्णालय सुरू केले जाणार आहे. येत्या सात दिवसात हे रुग्णालय उभे केले जाणार आहे. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर अध्यक्ष राहुल पवार तसेच महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.