कोविड रुग्ण, नातेवाइकांची जेवण, मुक्कामाची सोय करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:28 AM2021-05-06T04:28:41+5:302021-05-06T04:28:41+5:30
सांगलीत आयोजित बैठकीत प्रा. पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणावर उपासमार ...
सांगलीत आयोजित बैठकीत प्रा. पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणावर उपासमार व निवासाची गैरसोय होत आहे. त्यामुळे जिल्हा जनता दलातर्फे त्यांची मोफत जेवण व राहण्याची सोय करण्यात येणार आहे. गरजूंनी आमच्याशी संपर्क साधावा.
जिल्हा प्रशासनाने कोविड रुग्णांसाठी सुरू केलेली हेल्पलाईन सुविधा कुचकामी ठरली आहे. त्यांच्याकडून कुठलीही मदत रुग्णांना मिळत नाही. व्हेंटिलेटर बेडअभावी अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. त्याचे कोणतेही नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेले नाही. केंद्र व राज्य शासनाकडून मिळालेले काही व्हेंटिलेटर हे खासगी कोविड रुग्णालयांना देण्यात आले आहे. ही रुग्णालये रुग्णांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करीत आहेत. गरीब रुग्ण उपचाराअभावी प्राण गमावत आहेत. महापालिकेने मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्येही व्हेंटिलेटर बेडची सुविधा नाही. यामुळे येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांनाही प्राण गमवावे लागण्याची भीती आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून रुग्णांची हेळसांड थांबवून त्यांना जीवदान द्यावे.
महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत मिरज महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आरोग्य यंत्रणेला मदत व सहकार्य करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने कोविडच्या रुग्णांना योग्य ते उपचार व सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात,. अशी मागणीही प्रा. शरद पाटील यांनी केली.
यावेळी शशिकांत गायकवाड, जनार्दन गोंधळी, अश्विन पाटील, सुमित पाटील, ॲड. फैय्याज झारी, सलीम सय्यद, सुधीर बनसोडे, शाम कांबळे, दादासाहेब पाटील, नरसगोंडा पाटील उपस्थित होते.