कोविडच्या प्लास्टीक कचऱ्यामुळे कचरावेचक महिलांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:55 PM2020-12-22T16:55:35+5:302020-12-22T16:58:35+5:30
collector Office Sangli Morcha - कोरोना व लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या कचरावेचक महिलांना रोजगार देण्याची मागणी अवनि संस्थेने केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली व मिरज शहरातील कचरावेचक महिलांनी आंदोलनात भाग घेतला.
सांगली : कोरोना व लॉकडाऊनमुळे उपासमार होत असलेल्या कचरावेचक महिलांना रोजगार देण्याची मागणी अवनि संस्थेने केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सांगली व मिरज शहरातील कचरावेचक महिलांनी आंदोलनात भाग घेतला.
अवनिचे जिल्हा समन्वयक जैनुद्दीन पन्हाळकर, उपाध्यक्षा अनुराधा भोसले, यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात ५०४ महिला कचरा गोळा करुन पुनर्वापरासाठी उपयोगात आणतात.
प्लास्टीक कचर्याची मोठी समस्या त्यांच्या कामामुळे सुसह्य झाली आहे. पण कोरोना व लॉकडाऊन काळात त्यांचे हाल सुरु आहेत. कोविड विषाणूचा संसर्ग झालेला प्लास्टीक कचरा संकलीत करणे धोक्याचे ठरत आहे. लॉकाडाऊनमुळेही कचरा संकलनासाठी बाहेर पडता आलेले नाही. त्यामुळे उपासमार सुरु आहे. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार उपलब्ध करुन द्यावा.
संघटनेने मागणी केली की, प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व कचरावेचक महिलांचे सर्वेक्षण करावे. ओळखपत्रे द्यावीत. त्यांच्या बचत गटांना कचरा वर्गीकरणाचे काम द्यावे. वीजबील माफ करावे. रोजगार द्यावा अथवा बेरोजगार भत्ता मिळावा.
मनरेगा योजना शहरी भागातही लागू करावी. वारांगणांप्रमाणे कचरावेचक महिलांनाही मुख्यमंत्री निधीतून पाच हजारांची मदत द्यावी. राज्यातील कचरावेचक महिलांचे कल्याणकारी मंडळ स्थापन करावे. आंदोलनात सोनाली कांबळे, स्मीता गायकवाड, हिना गोसावी, रुकैय्या पटेल, राधिका झांबरे आदींनी भाग घेतला.
१० जानेवारीपासून उपोषण
अवनि संस्थेने सांगितले की, कचरावेचक महिलांच्या मागण्यांविषयी सकारात्मक निर्णय झाला नाही तर १० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले जाईल.