कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; कृष्णेची पातळी ३५ फुटांवर जाणार, जलसंपदा विभागाकडून संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 01:00 PM2022-08-13T13:00:58+5:302022-08-13T13:01:54+5:30
सांगली : वारणा (चांदोली) आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. कोयनेतून शुक्रवारी १० हजार १०० क्युसेकने, तर ...
सांगली : वारणा (चांदोली) आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. कोयनेतून शुक्रवारी १० हजार १०० क्युसेकने, तर वारणेतून नऊ हजार ३७१ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा-वारणेच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. शनिवारी सांगलीत आयर्विनची पातळी ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली. कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आल्याचे चित्र होते.
धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच आहे. वारणा धरण क्षेत्रात चोवीस तासांत १४८ मिलिमीटर पाऊस झाला. धरणात ३१.५४ टीएमसी पाणीसाठा असून, ९२ टक्के धरण भरले. धरणातून नऊ हजार ३७१ क्युसेकने विसर्ग सुरूच आहे. कोयना धरण क्षेत्रात २०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात ८८.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ८५ टक्के भरल्याने १० हजार १०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र शुक्रवारी शिराळा तालुका वगळता उर्वरित तालुक्यात पावसाने उसंत घेतली. शिराळा, वाळवा तालुक्यांतील काही भागात रिमझिम पाऊस झाला.
एनडीआरएफची दोन पथके दाखल
जिल्ह्यात दोन एनडीआरएफ पथके दाखल झालेली आहेत. अद्याप जिल्ह्यामध्ये कोणतीही पूर परिस्थिती नाही. तथापी दक्षता घेण्याच्या अनुषंगाने ही पथके उपलब्ध ठेवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. एनडीआरएफ, पुणेचे सहायक कमांडंट सारंग कुर्वे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक आष्टा (मनोजकुमार शर्मा पथकप्रमुख) व एक पथक सांगलीमध्ये (रघुवंश, पथकप्रमुख) ठेवण्यात येणार आहे. या पथकामध्ये प्रत्येकी २२ जवान व प्रत्येकी चार बोटी उपलब्ध आहेत.
शिराळ्यात २७ मिलिमीटर पाऊस
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक २७.४ मि.मी. पाऊस झाला. मिरज ४.५, जत ०.५, खानापूर ६.०, वाळवा ११.६, तासगाव ५.७, शिराळा २७.४, आटपाडी ०.५, कवठेमहांकाळ २.६, पलूस ७, कडेगाव ७.१ मिलिमीटर आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका : ज्योती देवकर
धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी वाढत राहणार आहे. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी शुक्रवारी ३५ फुटांवर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे. आरळा-शित्तूर, काखे-मांगले पूल पाण्याखाली गेला. याशिवाय दोन्ही नद्यांवरील १३ बंधारे पाण्याखाली गेलेले कायम आहेत.
अलमट्टीतून सव्वादोन लाख क्युसेकने विसर्ग
अलमट्टी धरणामध्ये १२३ टीएमसी पाणीसाठा करण्याची क्षमता आहे. मंगळवारी धरणात १०७.७२ टीएमसी पाणीसाठा होता. धरणात एक लाख ५५ हजार ४७ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच दोन लाख २५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू करून दहा टीएमसीने पाणीसाठा कमी करून सध्या १०७.७२ टीएमसी ठेवला आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास आणखी विसर्ग वाढविण्याची अलमट्टी जलसंपदा प्रशासनाने तयारी ठेवली आहे.
कृष्णा पूल कराड १८.१०
बहे १०.६
ताकारी ३२
भिलवडी पूल ३१.५
आयर्विन ३०
अंकली ३७.३
म्हैसाळ ४३
राजापूर बंधारा ४४
धरणातील पाणीसाठा
धरण क्षमता सध्याचा पाणीसाठा टक्केवारी
अलमट्टी १२३ १०७.७२ ९३.८८
कोयना १०५.२३ ८८.९७ ८५
वारणा ३४.२० ३१.५४ ९२