दिवसा धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसला चक्क स्लीपर डबे!, प्रवाशांना भुर्दंड; सीटिंग डबे वाढविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 12:56 PM2022-08-23T12:56:47+5:302022-08-23T12:57:12+5:30
बसून प्रवासाचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना नाईलाजाने स्लीपर डब्यातून महागडा प्रवास करावा लागत आहे
सांगली : कोरोना काळानंतर रेल्वे प्रशासन प्रवाशांची कोंडी करणारे अनेक निर्णय घेत आहे. मुलांचे अर्धे तिकीट रद्द करणे, ज्येष्ठ नागरिकांना सवलत नाकारणे अशा निर्णयांनी रेल्वेची टोकाची व्यावसायिक वृत्ती स्पष्ट होत आहे. असाच एक निर्णय प्रवाशांच्या टीकेचा धनी होऊ लागला आहे. कोल्हापूर ते मुंबईदरम्यान दिवसा धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेसला चक्क स्लीपरचे डबे जोडले आहेत. त्याऐवजी सीटिंग डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
सोळा डब्यांच्या कोयनेला सध्या दोन वातानुकूलित चेअरकार, एक थ्री टायर वातानुकूलित आणि एक स्लीपर डबा जोडण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगलीतून मुंबईला दिवसा धावणारी ही एकमेव एक्स्प्रेस आहे, त्यामुळे प्रवाशांची गर्दी असते. आरक्षण सातत्याने वेटिंग असते. या स्थितीत आरक्षित डबे वाढविण्याऐवजी स्लीपर आणि वातानुकूलित डबे जोडण्यात आले आहेत. बसून प्रवासाचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना नाईलाजाने स्लीपर डब्यातून महागडा प्रवास करावा लागत आहे. रेल्वेच्या नियमानुसार पहाटे सहा ते रात्री दहादरम्यान स्लीपर बोगीत झोपून प्रवास करता येत नाही. कोयना एक्स्प्रेसमध्ये मात्र झोपून प्रवासासाठी रेल्वेनेच उत्तेजन दिले आहे.
कोल्हापूर ते मुंबईदरम्यानचा बारा तासांचा प्रवास बसून करणे शक्य नसलेल्या ज्येष्ठांसाठी ही सोय चांगली आहे, पण त्याऐवजी सीटिंगचे आरक्षित डबे वाढविले असते, तर प्रवाशांची सोय झाली असती अशा प्रतिक्रिया आहेत. मिरज ते पुणेदरम्यान वातानुकूलित चेअरकारचे तिकीट तब्बल ४२० रुपये आहे, त्यामुळे हे डबेही सध्या रिकामेच धावत आहेत.
गदग कनेक्शनमुळे स्लीपर डबे
कोल्हापुरातून मुंबईला रात्री पोहोचलेली कोयना एक्सप्रेस रात्री मुंबई - गदग एक्सप्रेस म्हणून सुटते. गदगच्या सोयीसाठी कोयनेला स्लीपर व वातानुकूलित डबे दिवसभर नाहक वाहून न्यावे लागत आहेत.
रेल्वे प्रशासनाने कोयना एक्स्प्रेसवर निरर्थक प्रयोग करण्याऐवजी सीटिंगचे डबे वाढवून प्रवाशांची सोय करावी. स्लीपर आणि वातानुकूलित डबे काढून त्याठकाणी आरक्षित डबे जोडावेत. - उमेश शहा, सांगली रेल डेव्हलपमेन्ट ग्रुप