Sangli: मिरजेत कोयता गँगचा दुकानात घुसून तरुणावर हल्ला, हत्यारे नाचवत दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 12:04 PM2024-06-01T12:04:55+5:302024-06-01T12:04:55+5:30
पुण्यातील कोयता गँगचे लोन मिरजेपर्यंत
मिरज : पुण्यातील कोयता गँगचे लोन मिरजेपर्यंत पोहोचले असून, मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी सायंकाळी फिल्मी स्टाइलने एका दुकानात घुसून १५ ते २० जणांच्या जमावाने तरुणावर कोयत्याने हल्ला करत जखमी केले. पृथ्वीराज शिंदे (वय ३०, रा. पूर्व म्हाडा कॉलनी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. कोयता गँगने हातात कोयते, लोखंडी सळया, पाइप घेऊन दुचाकीवरून दहशत माजवली होती.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात असणाऱ्या मंगेश कदम यांच्या मंगेश हेअर सलून या दुकानात काम करणाऱ्या पृथ्वीराज शिंदे यांच्या डोक्यावर कोयत्याचे वार झाल्याने तो जखमी झाला. दुचाकीवरून कोयते, लोखंडी सळया नाचवत आलेल्या हल्लेखोरांनी शिवाजी चौक कमानवेस, म्हाडा कॉलनी परिसरात दुचाकीवरून फिरत विरोधी गटातील तरुणांच्या घरासमोर राडा करत दहशत निर्माण केली. शिवाजी चौकात पृथ्वीराज शिंदे याच्यावर हल्ला करून हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला.
जखमी पृथ्वीराज या तरुणास उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनास्थळी मिरज शहर पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. दोन गटांतील पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली. याप्रकरणी मंगेश कदम याने शहर पोलिसात फिर्याद दिली असून, पवनसिंग रजपूत व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.