कुंडल येथे पुतळ्याशिवाय उभारले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारक अजब कारभार : नऊ वर्षे केवळ इमारतीची होते देखभाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:37 AM2018-01-05T00:37:14+5:302018-01-05T00:38:03+5:30
सांगली : स्वातंत्र्य संग्रामाची धगधगती मशाल म्हणून ज्या क्रांतिसिंहांची इतिहासात नोंद झाली, त्यांच्या नावाच्या स्मारकांबाबत मात्र शासनदरबारी अनास्था
सांगली : स्वातंत्र्य संग्रामाची धगधगती मशाल म्हणून ज्या क्रांतिसिंहांची इतिहासात नोंद झाली, त्यांच्या नावाच्या स्मारकांबाबत मात्र शासनदरबारी अनास्था दिसून येते. कुंडल या त्यांच्या कर्मभूमीत पुतळ्याशिवाय स्मारक उभारले गेले. केवळ इमारतीला स्मारक संबोधून त्यासाठी मंजूर असलेली सर्व रक्कम खर्च करण्यात आली. आता इमारतीत पुतळा हवा असेल, तर नवा प्रस्ताव देण्याचे अधिकाºयांनी सुचविले आहे.
सांगली जिल्ह्यात तत्कालीन राज्य शासनाने येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे त्यांच्या जन्मगावी आणि कुंडल येथील त्यांच्या कर्मभूमीत स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. २00५ मध्ये या इमारतींच्या बांधकामास सुरुवात झाली. २00८ मध्ये या दोन्ही स्मारकांच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. येडेमच्छिंद्र येथे क्रांतिसिंहांचा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे. मात्र कुंडल येथील स्मारकाची इमारत पुतळ्याशिवाय उभी राहिली. पुतळ्यासाठी सुरू असलेल्या प्रतीक्षेला आता दहा वर्षे पूर्ण होत आहेत, तरीही स्मारकात पुतळा बसविण्याबाबत कोणतेही पाऊल शासनस्तरावर उचलले जात नाही. दीड कोटी रुपये या स्मारकाच्या इमारतीसाठी खर्च करण्यात आले.
स्मारकाच्या मूळ आराखड्यातच पुतळ्याचे विस्मरण झाले. त्यामुळे आराखड्याप्रमाणे केवळ इमारतच उभी राहिली. बाहेरच्या बाजूस केवळ नाव आहे, म्हणून हे क्रांतिसिंहांचे स्मारक असल्याचे लोकांना समजले, मात्र प्रत्यक्षात आत पुतळाच नसल्याने अपूर्णत्वाच्या वेदना येथील नागरिकांना होतात. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पुतळ्याशिवाय स्मारक कसे?, असा प्रश्न राष्टÑवादीचे नेते शरद लाड यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नाने आमदार, खासदारांबरोबर जिल्हाधिकारीही अवाक् झाले. त्यांनी अधिकाºयांना याबाबत खुलासा करण्यास सांगितले, तेव्हा अधिकाºयांनी आराखड्यातच पुतळा नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पुतळ्यासाठी नवा प्रस्ताव तयार करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता पुतळ्यासाठी तब्बल दहा वर्षानंतर संघर्ष करण्याची वेळ आली आहे. २०१२ मध्ये सरकारने परिपत्रक काढून, येडेमच्छिंद्र येथील स्मारक राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टकडे, तर कुंडल येथील स्मारक क्रांती सहकारी साखर कारखान्याकडे देखभाल व्यवस्थेसाठी दिले. क्रांती कारखान्याकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने देखभाल केली जात असली तरी, कारखाना व्यवस्थापनाला नेहमीच याठिकाणी पुतळ्याची उणीव भासते. स्मारकाप्रती शासकीय उदासीनता वारंवार स्पष्ट होते.
काय आहे स्मारकात...
या स्मारकामध्ये म्युझियम, एक सुसज्ज ग्रंथालय, डायनिंग हॉल, बगीचा या गोष्टींचा समावेश आहे. स्मारकाची इमारतही देखणी आहे.