क्रांतिसिंहांच्या पत्री सरकारची पुन्हा गरज
By admin | Published: December 9, 2014 10:54 PM2014-12-09T22:54:28+5:302014-12-09T23:26:49+5:30
प्रतिमा परदेशी : क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन
विटा : क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकारची पुन्हा एकदा गरज निर्माण झाली आहे. त्यांनी केलेला संघर्ष हा केवळ गोऱ्या इंग्रजांच्या विरोधातच नव्हता, तर त्यांचा संघर्ष श्रमिक, शेतकरी, बहुजनांसाठी होता. त्यांनी स्थापन केलेल्या प्रतिसरकारच्या काळात महिला पूर्णत: निर्भय होत्या म्हणूनच महिला वर्गाने क्रांतिसिंहांच्या लढ्याला आश्रय दिला, असे प्रतिपादन विद्रोही साहित्य आणि संस्कृती चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले.
हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे क्रांतिसिंहांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कलमनुरी (ता. हिंगोली) येथील महिला शाहीर अनुसया शिंदे होत्या. यावेळी क्रांतिवीरांगणा हौसाताई पाटील, संपतराव जाधव, माधवराव मोहिते, उपस्थित होते. प्रारंभी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस प्रा. परदेशी व शाहीर अनुसया शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अनुसया शिंदे यांनी क्रांतिसिंहांनी मराठवाड्यातील निजामशाही नष्ट करण्यासाठी लढा दिला, मात्र शेतकऱ्यांसाठी लढा देणाऱ्या नेत्यांची काँग्रेसने उपेक्षा केल्याचे सांगितले. शाहीर शिंदे यांनी पोवाडा सादर केला, तर नाना पाटील यांच्या विचारांचे प्रचारक संपतराव जाधव यांचा गौरव करण्यात आला, तर एमएस्सीत विद्यापीठात प्रथम आलेल्या दिव्यांगना पाटील हिचा सत्कार करण्यात आला.
अॅड. सुभाष पाटील यांनी प्रास्ताविक केले. यवेळी कॉ. किरण माने, स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने, शिवाजीराव पवार, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, सु. धों. मोहिते, आनंदराव पाटील, धर्मेंद्र पवार, भाई संपतराव पवार, प्रा. लगारे, अॅड. नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)