क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:30 AM2021-09-24T04:30:59+5:302021-09-24T04:30:59+5:30
कडेगाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय ९५, रा. हणमंतवडिये, ता. कडेगाव) यांचे गुरुवारी सकाळी ...
कडेगाव : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील (वय ९५, रा. हणमंतवडिये, ता. कडेगाव) यांचे गुरुवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी पाच वाजता कऱ्हाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत माजी आमदार भगवानराव पाटील यांच्या त्या पत्नी; तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. सुभाष पाटील व प्रा. विलास पाटील यांच्या मातोश्री होत.
हौसाताई पाटील यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२७ रोजी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे झाला. वडील क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सरसेनापती म्हणून भूमिगत झाले, तर हौसाताई तीन वर्षांच्या असतानाच आईचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आजी गोजराबाई यांनी त्यांना आईचे प्रेम देत सांभाळ केला. पोलीस सतत नाना पाटील यांच्या पाळतीवर असल्याने ते मुलीला भेटायला येत नसत. महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ आजीच्या नसानसात भिनलेली होती. आजीकडून सत्यशोधक चळवळीचे बाळकडू घेतच हौसाताई मोठ्या झाल्या.
१९४० मध्येे वयाच्या तेराव्यावर्षी हणमंतवडिये येथील चळवळीतील तरुण भगवानराव पाटील यांच्याबरोबर हौसाताईंचे लग्न झाले. स्वातंत्र्यलढ्यात त्या सक्रिय होत्या. क्रांतिकारकांसमवेत त्यांनी अनेक मोहिमांत सहभाग घेतला होता. १९४३ ते १९४६ दरम्यान इंग्रजांच्या आगगाड्यांवर हल्ले करणाऱ्या, पोलिसांची शस्त्रे पळविणाऱ्या, डाक बंगले पेटवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या चमूत त्या होत्या. त्या इंग्रजांची माहिती गोळा करून क्रांतिकारकांपर्यंत पोहोचवत. हैदराबाद मुक्ती संग्राम आणि गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता.
स्वातंत्र्यानंतर महागाईविरोधी आंदोलन, दुष्काळविरोधी लढ्यात त्या अग्रेसर होत्या. आयुष्यभर कष्टकरी, श्रमिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्या लढत राहिल्या. पाणी प्रश्न, दुष्काळी भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लढा दिला. २००२ मध्ये खानापूर तहसील कार्यालयासमोर शंभर दिवसांहून अधिककाळ धरणे आंदोलन केले होते.
चाैकट
देहदानाची इच्छा अपूर्ण
हौसाताईंचे संपूर्ण जीवन शोषणविरहित समाज निर्मितीसाठी, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तसेच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी गेले. तरुणांना लाजवेल अशी हिंमत, धाडस आणि करारी आवाज असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. तथापि त्यांच्यावर कोविड वॉर्डमध्ये उपचार सुरू असल्याने शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे क्रांतिवीरांगणेची देहदानाची इच्छा अपूर्ण राहिली.