संकटांवर मात करीत कृषीकन्येची भरारी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:19 AM2018-10-16T00:19:04+5:302018-10-16T00:21:10+5:30
‘शेतकरी नवरा नको’ अशी मुलींची भूमिका असते, मात्र मिरजेतील स्मिता कुपवाडे यांनी शेतकरी नवरा स्वीकारला. आता तर त्या पतीच्या निधनानंतर द्राक्ष शेती करीत कृषी सेवा केंद्र चालवत आहेत.
- सदानंद औंधे, मिरज.
‘शेतकरी नवरा नको’ अशी मुलींची भूमिका असते, मात्र मिरजेतील स्मिता कुपवाडे यांनी शेतकरी नवरा स्वीकारला. आता तर त्या पतीच्या निधनानंतर द्राक्ष शेती करीत कृषी सेवा केंद्र चालवत आहेत. सेंद्रीय भाजीपाला उत्पादन, टेरेस गार्डनमध्ये भाजीपाला व फूलझाडांचे संगोपन, कृषी पदवीचे शिक्षण घेत महिलांच्या शारीरिक, स्वास्थ्यासाठी स्वयंसेवी संस्था चालवणाऱ्या स्मिता कुपवाडे यांनी परिस्थितीशी झगडा करीत यश मिळविले आहे.
उगार येथील स्मिता मिरजेतील वीरेंद्र या मामाच्या मुलासोबत विवाहानंतर मिरजेत आल्या. शेती करणारे सासरे व पती यांचे पाठोपाठ निधन झाल्याने स्मिता कुपवाडे यांच्यावर मोठे संकट कोसळले. या धक्क्यातून सावरत जुळ्या मुलांची व कुटुंबाची जबाबदारी पेलत सासरे व पतीचा व्यवसाय जिद्दीने पुढे चालविण्याचे आव्हान स्मिता कुपवाडे यांनी स्वीकारले.
पती व सासºयांच्या निधनानंतर नोकरी करावयाची नाही हा विचार पक्का होता. कौटुंबिक व्यवसाय असलेले कृषी सेवा केंद्र त्यांनी सुरू केले. कृषी सेवा व्यवसायात महिला नाहीत, याची व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांना माहिती नव्हती. कुठल्याही क्षेत्रात गेले तरी महिलांना अडचणी व आव्हानांना तोंड द्यावेच लागते, मात्र कृषी सेवा केंद्र चालवणारी एकमेव महिला असल्याने अनेकांचे त्यांना सहकार्य मिळाले.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने व्यवसायात संपर्क येणारे शेतकरी, विक्रेता, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी अशा सर्वांकडून शिकायला मिळाले.धैर्य, आत्मविश्वास व सकारात्मकता असल्यास कृषी सेवा केंद्र या व्यवसायातही महिलांना संधी असल्याचे स्मिता कुपवाडे यांनी सिध्द केले आहे. कृषी सेवा केंद्रासोबत त्या स्वत: दोन एकर द्राक्षशेती करीत आहेत. द्राक्षबागेत ट्रॅक्टरव्दारे औषध फवारणीपासून सर्व कामे त्या स्वत: करतात. गेली दोन वर्षे अनुभवी बागायतदार शेतकºयांप्रमाणेच त्या द्राक्षबागेत उत्पन्न मिळवत आहेत. सेंद्रीय भाजीपाला उत्पादनाचे प्रयोग व घरातील कचरा टेरेस गार्डनसाठी वापरून टेरेस गार्डनमध्ये भाजीपाला, औषधी वनस्पती व फूलझाडांचे संगोपन त्या करीत आहेत.
दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर सासरी येऊन स्मिता कुपवाडे यांनी एम. कॉम., जीडीसीए पदवी मिळविली. सध्या त्या मुक्त विद्यापीठातून कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी साकार फौंडेशन या स्वयंसेवी संस्थेची त्यांनी स्थापना केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेतर्फे महिलांसाठी ग्रामीण भागात व वेगवेगळ्या शहरात आरोग्य शिबिरे घेण्यात येतात. स्मिता यांची जुळी मुले सहावीत शिकतात. कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्या शेती, शेतीपूरक व्यवसाय व स्वत:चे छंद जोपासत आहेत. शेती व शेतीपूरक उद्योगासाठी सासू व आई-वडिलांनी त्यांना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. संकटांवर संकटे येत असतानाही या कर्तृत्वशालिनीने त्यांना सामोर जात कुटुंबियांना आधार देण्याचे काम केले.
मुलींनी शेतीबाबत दृष्टिकोन बदलणे आवश्यक..!
शेतीकडे संपत्ती म्हणून पाहिले जाते; मात्र शेतकरी नवरा नको ही भूमिका योग्य नाही. मुलींनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. शेती व त्याच्याशी निगडीत व्यवसायात महिला व मुलींनाही संधी आहे. महिलांनी करिअरची एक संधी म्हणून इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रात यावे असे आवाहन स्मिता कुपवाडे यांनी केले.
स्मिता कुपवाडे, शेतकरी, व्यावसायिक
मोबाईल क्र. : ७७७३९३८५५५