कृष्णा आली होऽऽऽ अंगणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 11:26 PM2016-03-30T23:26:09+5:302016-03-30T23:47:02+5:30
गार्डीत टेंभूच्या पाण्याचे स्वागत : महिलांनी भरली खणा-नारळाने ओटी
विटा : गेल्या दोन तपापासून प्रतीक्षा असलेल्या टेंभू योजनेचे पाणी अखेर बुधवारी दुष्काळी खानापूर तालुक्यातील गार्डी गावात पोहोचताच ग्रामस्थांनी जल्लोष केला. करंज ओढ्याच्या पात्रातमाता-भगिनींनी कृष्णामाईची खणा-नारळाने ओटी भरली. अबालवृध्दांनी मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला. आ. अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून गार्डी, घानवड व हिंगणगादे येथील शेतकऱ्यांचे स्वप्न साकार झाले आहे.
दुष्काळी खानापूर तालुक्यात टेंभू योजनेच्या माध्यमातून कृष्णामाई अंगणी आली आहे. माहुली येथील टप्पा क्र. ३ ब मधून मुख्य कालव्याव्दारे टेंभूचे पाणी आणून करंज ओढ्यात सोडण्यात आले आहे. ओढ्यातील गार्डी, घानवड, हिंगणगादे हद्दीतील ३० बंधारे या पाण्याने भरणार आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐन दुष्काळात संपुष्टात येणार आहे.
या पाण्याचे बुधवारी सकाळी गार्डी येथे आगमन होताच ग्रामस्थांनी जल्लोषी स्वागत केले. गार्डी, घानवड व हिंगणगादे येथील गावकऱ्यांचे कृष्णेच्या पाण्याचे स्वप्न साकार झाल्याने आ. बाबर यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व ‘नाथबाबांच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करण्यात आला. करंज ओढ्यात महिलांनी कृष्णामाईची खणा-नारळाने ओटी भरली. त्यानंतर आ. बाबर यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याचे पूजन केले. कृष्णेचे पाणी पहिल्यांदाच ओढ्यात आल्याने अबालवृध्दांनी पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला. (वार्ताहर)
गुलालाची उधळण : चांगभलं!
गार्डी येथे कृष्णामाईचे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामदैवत ‘नाथबाबाच्या नावानं चांगभलं’ करीत जयघोष केला. गुलालाची प्रचंड उधळण झाल्याने गावातील रस्ते गुलालाने माखले होते. आ. बाबर यांच्या निवासस्थानात तर गुलालाचा खच पडला होता.
आनंदोत्सव साजरा...
गुढीपाडव्याला अजून नऊ दिवसाचा अवधी असला तरी, गार्डी गावात कृष्णामाईने प्रवेश केल्यानंतर ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आले. गावात ग्रामस्थांनी बुधवारी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला. ग्रामदैवत नाथबाबांना अभिषेकही घालण्यात आला.