वाळवा-शिराळ्यातील नेत्यांची पक्षनिष्ठा कृष्णेच्या डोहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:34 PM2019-03-31T23:34:36+5:302019-03-31T23:34:41+5:30

अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या रणांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी हे ...

Krishna-dominated leader of the Drauva-Shirala leaders | वाळवा-शिराळ्यातील नेत्यांची पक्षनिष्ठा कृष्णेच्या डोहात

वाळवा-शिराळ्यातील नेत्यांची पक्षनिष्ठा कृष्णेच्या डोहात

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या रणांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बांधावर जाऊन बसले आहेत; तर शिवसेनेचे घोडे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या गंगेत पवित्र झाले आहे. या एकूणच राजकीय घडामोडीत वाळवा-शिराळ्यातील विविध पक्षांतील व गटातील नेत्यांनी आपली निष्ठा मात्र कृष्णेच्या डोहात बुडविल्याचेच समोर येत आहे.
वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आ. जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. युती सरकार सत्तेत आल्यापासून या तालुक्यातील राष्ट्रवादीचा आलेख ढासळू लागला आहे. याच पक्षातील जिल्ह्याचे अध्यक्ष विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची नुकतीच औद्योगिक महामंडळावर निवड झाली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या घरातच पक्षनिष्ठा वेशीला टांगणीला लागली आहे.
गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतील नेत्यांनीच काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी विरोधी उमेदवार खा. राजू शेट्टी यांचे वाभाडे काढले होते. आता हेच नेते राजू शेट्टी यांचे गोडवे गाणार आहेत. याचा प्रारंभही येडेमिच्छिंद्र येथील प्रचार सभेतून झाला. या राजकीय परिस्थिती बदलामुळे नेत्यांना आपली पक्षनिष्ठा कृष्णेच्या डोहात विसर्जित करावी लागली आहे.
स्वाभिमानीचे खा. राजू शेट्टी यांना शह देण्यासाठी भाजपने सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद देऊन त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवली आहे. याच ताकदीवर त्यांनी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रयत क्रांती संघटनेची स्थापना केली. आजही ते रयत क्रांतीचा बिल्ला छातीवर लावत असले तरी, त्यांच्या खांंद्यावर असलेली झूल मात्र भाजपची आहे. ज्या राष्ट्रवादी, भाजपवर पूर्वी खोत पोटतिडकीने आरोप करायचे, तेच आता भाजपचे गोडवे गाऊ लागले आहेत. आता तर शिवसेनेने त्यांच्याकडे हातकणंगले मतदार संघातील प्रचाराची धुरा दिली आहे. त्यामुळे संघटना एक, मंत्रीपद एकाचे आणि प्रचार तिसऱ्याचाच या तिहेरी भूमिकेतून खोत यांना जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनाही आपली निष्ठा बाजूला ठेवावी लागली आहे.
वाळव्याचे हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनीही कोणत्याही पक्षाला जवळ केलेले नाही. ज्याची सत्ता त्याचे आम्ही, हा फॉर्म्युला वापरुन आपली कामे करवून घेतली आहेत. हुतात्मा संकुलातील विविध कार्यक्रमांस प्रत्येकवेळी विविध पक्षांतील नेत्यांना आमंत्रित करून, आपली निष्ठा नेमकी कोणावर, हे त्यांनी कळू दिलेले नाही.
महाडिक गट द्विधावस्थेत
पेठनाक्यावरील महाडिक गटाने तर आपली निष्ठा कोणावर हेच गुलदस्त्यात ठेवले आहे. नानासाहेब महाडिक पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे होते. परंतु दोन्ही काँग्रेसकडून त्यांना नेहमीच आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी प्रत्येक पक्षातील नेत्यांना समान अंतरावर ठेवले आहे. पेठनाक्यावरुन जाणाऱ्या प्रत्येक नेत्याचा सत्कार करणे हा एककलमी कार्यक्रम त्यांनी आखला आहे. आता तर महाडिक गट द्विधावस्थेत आहे. हातकणंगलेत कोणाचा प्रचार करायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

Web Title: Krishna-dominated leader of the Drauva-Shirala leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.