‘कृष्णा’वर रूबाब वाळव्याचा, दबाव जयंतरावांचा
By admin | Published: June 30, 2015 11:17 PM2015-06-30T23:17:49+5:302015-06-30T23:17:49+5:30
चर्चेला ऊत : नव्या समीकरणांबाबत तर्क-वितर्क; सत्ता स्थापनेसाठी दोन्ही नेत्यांमध्ये खलबते
अशोक पाटील - इस्लामपूर -रेठरे बुद्रुक येथील कृष्णा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची माळ डॉ. सुरेश भोसले यांच्या गळ्यात पडणार, हे निश्चित असले तरी, वाळवा तालुक्यात मात्र नव्याच चर्चेला ऊत आला आहे. कारखान्यात माजी मंत्री आ. जयंत पाटील गटाचे वाळवा तालुक्यातील आठ, तर अविनाश मोहिते गटाचे सहा संचालक आहेत. हे दोघे एकत्र येऊन ‘कृष्णा’वर सत्ता स्थापन करतील का, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
‘कृष्णा’च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक ४ जुलैरोजी होत आहे. कारखान्याच्या निवडणुकीची हवा वाळवा तालुक्यात आजही कायम आहे. तालुक्यातील बोरगावचे जितेंद्र पाटील वगळता सर्व संचालक आ. जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणारे आहेत. या सर्व संचालकांनी निवडीनंतर लगेचच राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावरील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निष्ठा दाखवली होती.
प्रचारादरम्यान वाळवा तालुक्यातील संस्थापक आणि सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी डिजिटल फलकांवर जयंत पाटील यांची प्रतिमा झळकवली होती. त्यामुळे जयंत पाटील नेमके कोणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. अंतिमक्षणी त्यांनी अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेलचे काम करा, असा सल्ला दिल्याचे बोलले जात होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अविनाश मोहिते यांनी इस्लामपूर येथे येऊन जयंत पाटील यांच्याशी दीड तास बंद खोलीत चर्चा केली. त्यावेळी ‘कृष्णा’वरील सत्ता स्थापनेबाबत खलबते झाली.
‘तुमचे आठ आणि माझे सहा असे मिळून सत्ता स्थापन करू’, असा प्रस्तावही मोहिते यांनी मांडल्याचे समजते. मात्र जयंत पाटील यांचे समर्थक असलेले आठ संचालक भोसले यांच्या पॅनेलमधूनच निवडून आले आहेत. त्यामुळे ते अशा हालचाली करणार का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. कारखान्याचे अध्यक्षपद कऱ्हाड तालुक्याला आणि उपाध्यक्षपद वाळवा तालुक्याला हे समीकरण ठरले आहे, परंतु या चर्चेनुसार राजकीय खलबते झाली, तर ‘कृष्णा’वरील राजकारण पूर्णपणे बदलून जाणार आहे. येणाऱ्या चार दिवसात काय घडामोडी घडतात याकडे वाळवा, कऱ्हाड आणि कडेगाव तालुक्यातील सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे.
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत जरी माझे समर्थक निवडून आले असले तरी, माझे तिन्ही गटाच्या प्रमुखांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे मला ‘कृष्णा’मध्ये कसलेही स्वारस्य नाही. सत्तेबाबत माझ्या नावाची कोणीही ‘पावती’ फाडू नये!
- जयंत पाटील, माजी मंत्री.