कृष्णा कारखाना स्वार्थी टोळीने अडचणीत आणला
By admin | Published: November 7, 2014 11:01 PM2014-11-07T23:01:40+5:302014-11-07T23:43:49+5:30
पतंगराव कदम : रेठरे बुद्रुक येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात टीका
शिरटे : यशवंतराव मोहिते यांनी कृष्णा कारखाना हे सत्तेचे केंद्र कृष्णाकाठावर उभे केल्यानंतर लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले, पण याच कृष्णा उद्योगाचे काय होणार, याची मला चिंंता आहे. कारखान्याचे धुराडे टोळधाडीने व सल्लागारांनी अडचणीत आणले आहे की काय?, असे वाटत आहे, असा टोला आमदार पतंगराव कदम यांनी लगावला.
रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथे यशवंतराव मोहिते यांच्या ९४ व्या जयंत्तीनिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कारखान्याचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, हिंंदुराव मोहिते, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंंदे, शिवराज मोरे, बंडानाना जगताप, वि. तु. सुकरे, संचालक संपतराव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
कदम म्हणाले की, यशवंतराव व जयवंतराव यांच्यात मतभेद झाल्यावर संघर्षाची बीजे रोवली गेली. प्रगती खुंटली. त्यामुळे मी मध्यस्थी करून संघर्ष मिटवला, पण आता पुढे काय?, असा सवाल माझ्यासमोर आहे. यशवंतराव मोहिते यांनी सत्ता ही सेवेसाठी आहे, याची शिकवण दिली. व्यवहार आणि तत्त्वज्ञानाची सांगड घालता आली पाहिजे, हेही त्यांनी सांगितले.
डॉ. इंद्रजित मोहिते म्हणाले की, समाजकारण व मंत्रीपदे हा व्यवसाय नव्हे तर सेवा आहे असे भाऊंनी मला प्राथमिक शिक्षण घेत असतानाच सांगितले होते. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. मदनराव मोहिते यांनी स्वागत, विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी हणमंतराव पाटील, अजितराव थोरात, दिलीपराव मोरे, मानसिंग पाटील, वसंतराव पाटील, पी. सी. जाधव, दीपकराव पाटील, चंद्रशेखर पाटील, प्रदीप पटेल, अशोकराव थोरात, प्रसाद पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
सुरेश भोसले यांच्याकडून अभिवादन
रेठरेबुदु्रक येथील सौ. ताराबाई माधवराव मोहिते विद्यालयात कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्याहस्ते यशवंतराव मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य डॉ. पवार, पं. स. सदस्य धोंडीराम जाधव, कृष्णा बँकेचे संचालक हेमंत पाटील उपस्थित होते.