कृष्णा कारखान्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:21+5:302021-07-09T04:17:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरटे : रेठरे बुद्रुक (ता.कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : रेठरे बुद्रुक (ता.कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३१ मार्च अखेर जीएसटी कर प्रणाली नियमित भरणा करून तत्पर कार्यवाही केली. याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ अॅप्रिसिएशन प्रमाणपत्र' प्रदान करून सन्मान केला आहे.
डॉ. सुरेश भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कृष्णा कारखान्याकडून जीएसटी कराचा नियमित भरणा केला जातो. केंद्रिय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाचे अध्यक्ष एम. अजितकुमार यांनी हे प्रमाणपत्र प्रदान केले असल्याची माहिती कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.
केंद्र शासनाने जुलै २०१७ मध्ये जीएसटी कर प्रणाली लागू केली. तेव्हापासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अत्यंत तत्परतेने व नियमित जीएसटी रक्कम तसेच विवरण पत्रके वेळेत भरणा करून केंद्र शासनास सहकार्य केले आहे. त्याबद्दल भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाचे केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क मंडळाने कारखान्याला ‘सर्टिफिकेट ऑफ अॅप्रिसिएशन प्रमाणपत्र’ प्रदान करून सन्मान केला आहे. नियमित जीएसटी भरणा करण्याकामी जीएसटी कन्सल्टंट जी. एस. थोरात, अॅड. व्ही. बी. गायकवाड, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, फायनान्स मॅनेजर सी. एन. मिसाळ व कारखान्याच्या जीएसटी विभागाने विशेष परिश्रम घेतले.
चौकट
राज्याकडूनही झालेय अभिनंदन
सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने राज्य शासनाकडे व्हॅट करापोटी ७७ कोटी १६ लाख रुपये आणि जीएसटीपोटी ९ कोटी ५ लाख असा एकूण ८६ कोटी २१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. सातारा जिल्ह्यात इतक्या मोठ्या रकमेचा महसूल कर कृष्णा कारखान्याने शासनाकडे भरल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कृष्णा कारखान्याचे विशेष अभिनंदन केले होते.